व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर देणार
By admin | Published: June 19, 2015 12:29 AM2015-06-19T00:29:50+5:302015-06-19T00:36:41+5:30
नूतन कुलगुरूंची ग्वाही : कोल्हापूरचा वारसा समृद्ध करण्याचे भान राहील
कोल्हापूर : विद्यार्थी हा विकास केंद्रबिंदू मानून व्यवसायाभिमुख, कौशल्यपूर्ण शिक्षणावर भर देणार आहे. विविध क्षेत्रांत ठसा उमटविलेल्या कोल्हापूरचा शैक्षणिक वारसा विद्यापीठाच्या माध्यमातून अधिक समृद्ध करण्याच्या जबाबदारीने जमिनीवर पाय ठेवून कार्यरत राहीन, असे शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, गुणवत्तापूर्ण, संस्कृती जोपासलेल्या, संशोधनात्मक अशा अनेक बिरूदावल्या जोपासलेल्या शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरू होणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्णांतील शैक्षणिक विकास हे माझे उत्तरदायित्व राहील. कोल्हापूरचा शैक्षणिक वारसा अधिक समृद्ध करण्याची जबाबदारी मी मानतो. ती निभावण्यासाठी जमिनीवर पाय ठेवून कार्यरत राहीन. विद्यार्थी विकास हा केंद्रबिंदू मानून सर्वसमावेशक काम करणार आहे. विद्यार्थ्यांची रोजगाराभिमुखता वाढविण्यासह त्यांना व्यवसायाभिमुख, कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यावर मी भर देणार आहे. ग्रामीण तंत्रज्ञान, उद्योगांना अनुसरून अभ्यासक्रमांची रचना करणार आहे. विद्यापीठाच्या घटकांची निष्ठा, जबाबदारीने केलेल्या कामामुळे गुणवत्तेचा केंद्रबिंदू पुणे, मुंबईकडून कोल्हापूरपर्यंत सरकला आहे. विद्यापीठाची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्याचा प्रयत्न राहील. विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी संशोधन हा एकमेव मार्ग आहे. ते लक्षात घेऊन विज्ञानासह अन्य विद्याशाखांमधील संशोधनवाढीला बळ देणार आहे. परदेशातील विद्यार्थी आपल्या विद्यापीठाकडे येण्याचे प्रमाण कमी आहे. ते वाढविण्यासाठी पाश्चिमात्य विद्यापीठांतील विद्यार्थीभिमुख उपक्रम आणि विविध प्रकारच्या संशोधनाला साहाय्य करणाऱ्या केंद्र सरकारच्या योजना राबविणार आहे.
पत्रकार परिषदेस माजी प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, बीसीयूडी संचालक डॉ. आर. बी. पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)