शिस्त पाळा, मोबाईल टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:56 AM2018-05-21T00:56:00+5:302018-05-21T00:56:00+5:30
कोल्हापूर : येत्या महापौर निवडीत संघर्ष नक्की असल्याने गाफील राहू नका. गत स्थायी समिती निवडणुकीसारखे होऊ द्यायचे नाही. थोडी शिस्त पाळा, सहलीसाठी घरच्याच मंडळींना घेऊन चला. त्या ठिकाणी गेल्यानंतर मोबाईलचा वापर करू नका, अशा सूचना रविवारी आमदार सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांनी कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या नगरसेवकांना दिल्या.
ताराबाई पार्कातील सर विश्वेश्वरय्या हॉल येथे महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, माजी महापौर आर. के. पोवार, राष्टÑवादी कॉँगे्रसचे शहराध्यक्ष राजेश लाटकर, गटनेते सुनील पाटील, कॉँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, पक्षप्रतोद दिलीप पोवार, आदींची होती.
सतेज पाटील म्हणाले, आम्ही सर्व नगरसेवकांना भेटून बोललो आहे. यावेळी सर्वांच्या मनातील शंका दूर केल्याने आता किंतु-परंतु शिल्लक राहिलेले नाही. आघाडीच्या फॉर्म्युल्याप्रमाणे इथून पुढे सहा महिने महापौरपद हे कॉँग्रेसकडे राहील.
आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, यावेळची महापौर निवडणूक ऐतिहासिक आहे. गत स्थायी समिती निवडणुकीत जे घडले ते यावेळी होऊ देऊ नये. महापालिकेवर सत्ता असून त्यातील अजून अडीच वर्षे शिल्लक आहेत. अनेकांना या मांडवाखालून जायचे असून आपण गाफील राहिलो तर त्यांच्यावर अन्याय होईल, याची दक्षता सर्वांनी घ्यायची आहे.
यावेळी माजी महापौर स्वाती यवलुजे, हसिना फरास, अश्विनी रामाणे, माजी उपमहापौर अर्जुन माने, शमा मुल्ला, नगरसेवक अशोक जाधव, तौफिक मुल्लाणी, प्रताप जाधव, राहुल माने, सचिन पाटील, नगरसेविका शोभा बोंद्रे, सुरेखा शहा, सरिता मोरे, दीपा मगदूम, उमा बनछोडे, रिना कांबळे, निलोफर आजरेकर, वहिदा सौदागर, आदींसह आघाडीचे नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.
राष्टÑवादीचे चौघे गैरहजर
बैठकीला राष्टÑवादी कॉँग्रेसचे अफजल पीरजादे, अजिंक्य चव्हाण, मुरलीधर जाधव व अनुराधा खेडकर हे नगरसेवक गैरहजर होते. यामध्ये जाधव व खेडकर हे कामानिमित्त बाहेर असल्याचे त्यांनी आमदार मुश्रीफ यांना कळविल्याचे सांगण्यात आले; तर पीरजादे व चव्हाण यांनी पक्षाला काहीच कळविले नसल्याचे सांगण्यात आले.
नगरसेवक सहलीसाठी रवाना
ज्यांनी आतापर्यंत पदे भोगली आहेत, त्या सर्व नगरसेवक, नगरसेविकांसह यावेळी महापौरपदासाठी इच्छुक असलेल्यांनी तत्काळ सहलीसाठी रवाना व्हावे, अशा सूचना आमदार सतेज पाटील यांनी दिल्या. त्यानुसार रात्री आघाडीचे निम्मे नगरसेवक रवाना झाले.
मोबाईलनेच केला घात
सहलीला कोणीही मोबाईल नेऊ नका; गेल्या ‘स्थायी’ निवडणुकीत मोबाईलनेच घात केला; तर कर्नाटकच्या निवडणुकीत मोबाईल बंद केल्याने कॉँग्रेसचा विजय झाला, हे लक्षात घ्या, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
अर्ज आज दाखल होणार
कोल्हापूर : महापौरपद, उपमहापौरपदाची निवडणूक शुक्रवारी (दि. २५) होत आहे. त्यासाठी आज, सोमवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत अर्ज भरण्याची मुदत आहे. कॉँग्रेस आघाडीकडून नगरसेविका शोभा बोंद्रे, जयश्री चव्हाण, उमा बनछोडे, दीपा मगदूम, निलोफर आजरेकर, इंदुमती माने, प्रतीक्षा पाटील इच्छुक आहेत; तर भाजप-ताराराणी आघाडीकडून जयश्री जाधव, सविता भालकर, तेजस्विनी इंगवले, रुपाराणी निकम, स्मिता माने यांची नावे चर्चेत आहेत. दोन्ही आघाड्यांकडून दुपारपर्यंत नावे जाहीर होणार आहेत.