पाणलोट गैरव्यवहाराचा पाठपुरावा करू : शेट्टी

By admin | Published: September 30, 2016 12:31 AM2016-09-30T00:31:03+5:302016-09-30T01:35:36+5:30

जिल्हा सनियंत्रण समिती सभा : समितीला माहिती न देणाऱ्या विभागांबाबत थेट केंद्रालाच कळवू

Follow up the drainage deal: Shetty | पाणलोट गैरव्यवहाराचा पाठपुरावा करू : शेट्टी

पाणलोट गैरव्यवहाराचा पाठपुरावा करू : शेट्टी

Next

कोल्हापूर : पाणलोट योजनेमधील पैसे खर्च झालेत, पण जागेवर कामे दिसत नाहीत. स्वत: फिरून पाहिल्यानंतरच हे बोलतोय. त्या पैशांचे नेमके काय झाले, अशी विचारणा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना केली; परंतु त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शेट्टी यांनी या गैरव्यवहारप्रकरणी स्वत: पाठपुरावा करू, असा इशारा दिला. तसेच सनियंत्रण समितीला वेळेवर माहिती न देणाऱ्या विभागांची नावे थेट केंद्र सरकारला कळवू, अशी तराटणीही त्यांनी यावेळी दिली. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी तत्काळ संबंधित विभागांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी छत्रपती ताराराणी सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. हरीष जगताप, आदी मान्यवरांची होती.
पाणलोट गैरव्यवहारप्रकरणी नेमलेल्या पाणलोट जिल्हा समितीकडून व शासनाकडून कोणती कारवाई झाली? अशी विचारणा राजू शेट्टी यांनी जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांच्यासह त्यांच्या सहायक कृषी अधिकाऱ्यांना केली. यावर समितीच्या सूचनेनुसार कारवाई झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले; गैरव्यवहाराची रक्कमही काही लहान नाही, योजनांवर खर्च झाला आहे, परंतु कामे जागेवर दिसत नाही, त्यामुळे आपण स्वत:च याचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुडशिंगी (ता. हातकणंगले) येथील बंधाऱ्याचे काम निकृष्ट झाले असून, यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविल्याचे स्पष्ट केले.जिल्हाधिकारी डॉ. सैनी म्हणाले, जिल्ह्यात ऊसक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा याकरिता शासन पातळीवर उसाचा नगदी पिकांमध्ये समावेश करण्याकरिता तसा ठराव सादर करावा.


अधिकाऱ्यांनी केंद्राच्या योजनांसाठी पाठपुरावा करावा
प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा कार्यक्रम तसेच आवास योजना यासारख्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक असून, त्यादृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी ग्राम पातळीवर प्रबोधन करावे. तसेच शिबिरांचे आयोजन करावे. छत्रपती शाहू टर्मिनस वास्तूला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या वास्तूची दुरुस्ती करणे आवश्यक असून, तसा प्रस्ताव केंद्राकडे सादर करावा, अशी सूचनाही खा.राजू शेट्टी यांनी यावेळी केली.



अतिवृष्टीत शंभर
कोटींचे नुकसान
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेऊन अतिवृष्टीसंदर्भात आढावा घेतला आहे. यामध्ये शंभर कोटी रुपयांवर नुकसान झाले असून, याबाबतचा अहवाल शासनाला पाठवून जास्तीत जास्त रक्कम यासाठी आणण्यासाठी प्रयत्न करू, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. एक लाख शेतकऱ्यांना पीक विमा योजना अनुज्ञेय असून, संंबंधितांना याचा लाभ देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Follow up the drainage deal: Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.