कोल्हापूरचा फॉर्म्युला पाळा, अन्यथा तोडी बंद
By admin | Published: November 5, 2016 11:30 PM2016-11-05T23:30:34+5:302016-11-06T00:36:05+5:30
रघुनाथदादा पाटील : जिल्हाधिकाऱ्यांनी तोडगा काढावा; कार्यकर्त्यांची सांगलीत निदर्शने
सांगली : यंदाच्या एकरकमी एफआरपीसह टनास १७५ रुपये जास्त देण्याच्या कोल्हापूरच्या फॉर्म्युल्यापेक्षा एक रुपयाही कमी सांगली जिल्ह्यातील शेतकरी घेणार नाहीत. कारखानदारांनी दराची घोषणा केल्याशिवाय तोडी होऊ देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिला.
जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखानदारांशी चर्चा करून दराची घोषणा करावी, अन्यथा आंदोलनामुळे जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संघटना त्यास जबाबदार राहणार नाही. यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना संघटनेने दिले आहे.
पाटील म्हणाले की, उसाची तोडणी झाल्यापासून चौदा दिवसात शेतकऱ्यांना एफआरपी आणि त्यावर १७५ रुपये दिले पाहिजेत. त्यानंतर हंगाम बंद होताना सर्व हिशेब करून उपपदार्थ नसणाऱ्या कारखान्यांनी एकूण साखरेच्या ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना द्यावी आणि उर्वरित ३० टक्के रकमेत त्यांचा खर्च भागवायचा आहे. उपपदार्थ निर्मिती करणाऱ्या कारखान्यांनी ७५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना द्यायची आहे आणि उर्वरित २५ टक्के रकमेत खर्च भागवायचा आहे. याचा सर्व हिशेब केल्यानंतर शेतकऱ्यांना अंतिम दर प्रतिटन ३५०० रुपयेच मिळणार आहे. यामुळे या बैठकीतील तोडगा आम्हाला मान्य आहे, असे ते म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याप्रश्नी निदर्शनेही केली. (प्रतिनिधी)
तीव्र आंदोलन!
सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांना कोल्हापूरचा फॉर्म्युला मान्य नसेल, तर त्यांनी त्यापेक्षा जादा दर द्यावा. परंतु, त्यापेक्षा एक रुपयाही कमी घेतला जाणार नाही. कारखान्यांनी गळीत हंगाम सुरु करण्यापूर्वी दर जाहीर करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. एकाही कारखान्याची तोड चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.