नियम पाळा, लॉकडाऊन टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:21 AM2021-03-24T04:21:58+5:302021-03-24T04:21:58+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ‘नियम पाळा, लॉकडाऊन टाळा’ हे ब्रीद घेऊन व्यापारी, व्यावसायिकांनी ग्राहक, नागरिकांचे प्रबोधन ...
कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ‘नियम पाळा, लॉकडाऊन टाळा’ हे ब्रीद घेऊन व्यापारी, व्यावसायिकांनी ग्राहक, नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने संलग्नित संघटनांना मंगळवारी बैठकीत केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, महानगरपालिकेने नेमलेल्या भरारी पथकांनी संयम ठेवून काम करावे. व्यापारी, व्यावसायिकांना सन्मानाची वागणूक द्यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी, आयुक्तांची येत्या चार दिवसांमध्ये भेट घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाबाबत सोमवारी बैठक झाली. त्यातील निर्णय, सूचनांची माहिती संलग्नित संघटना, संस्थांना देण्यासाठी ‘कोल्हापूर चेंबर’च्यावतीने शिवाजीराव देसाई सभागृहात बैठक घेण्यात आली. व्यापारी, व्यावसायिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन स्वत: करून ग्राहक, नागरिकांचेही त्याबाबत प्रबोधन करण्यासाठी दुकानांच्या दर्शनी भागात फलक लावावेत. ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ ही मोहीम ताकदीने राबविण्याचा निर्णय ‘कोल्हापूर चेंबर’ने घेतला असल्याचे सचिव धनंजय दुग्गे यांनी सांगितले.
बाजारपेठ, व्यापारपेठेत केवळ दुकानांमुळे नव्हे, तर अन्य कारणांनी देखील गर्दी होते. अशी गर्दी नियंत्रित करण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने करावी. भरारी पथकांनी संयम ठेवून काम करावे. व्यापारी, व्यावसायिकांना सन्मानाची वागणूक द्यावी. एखाद्या व्यापारी, व्यावसायिकावर कारवाई करण्यापूर्वी त्याची माहिती ‘कोल्हापूर चेंबर’ला द्यावी, अशी सभासदांची मागणी असल्याचे माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया यांनी सांगितले.
त्यावर या मागण्यांबाबत आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासमवेत जिल्हाधिकारी, आयुक्तांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला. उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, सचिव संजय पाटील, वैभव सावर्डेकर, खजानिस हरिभाई पटेल यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबतच्या सूचना केल्या.
यावेळी प्रशांत शिंदे, राहुल नष्टे, अजित कोठारी, संपत पाटील, संभाजी पोवार, अविनाश नासिपुडे, शिवानंद पिसे, हितेंद्र पटेल, सीमा शहा, अनिल धडाम, ‘गोशिमा’चे अध्यक्ष श्रीकांत पोतनीस, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, बबन महाजन, संदीप वीर, नरेंद्र माटे उपस्थित होते.
व्यापारी, व्यावसायिकांनी हे करावे...
१) नो मास्क नो एंट्रीची कडक अंमलबजावणी करावी.
२) सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर करावा.
३) कोरोना नियमांच्या पालनाबाबत ग्राहक, नागरिकांचे प्रबोधन करावे.
४) जिल्हा प्रशासन, महानगरपालिकेने केलेल्या सूचनांचे पालन करावे.
फोटो (२३०३२०२१-कोल-चेंबर बैठक) :
कोल्हापुरात मंगळवारी सभासदांच्या बैठकीत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे सचिव संजय पाटील यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या सूचना केल्या. यावेळी डावीकडून प्रदीपभाई कापडिया, जयेश ओसवाल, शिवाजीराव पोवार, धनंजय दुग्गे, हरिभाई पटेल उपस्थित होते.