कोल्हापूरला खंडपीठासाठी पाठपुरावा, मुख्यमंत्र्यांची मुंबईतील बैठकीत ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 02:29 PM2022-03-09T14:29:11+5:302022-03-09T14:39:01+5:30
सहा जिल्ह्यांतील वकील व पक्षकार हे गेल्या ३५ वर्षांपासून खंडपीठासाठी प्रयत्न करत आहेत. सहा जिल्ह्यांतून साडेतीन लाख खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. कोल्हापुरात खंडपीठ झाल्यास पक्षकारांचा वेळ व पैसा याची बचत होणार आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीसह सहा जिल्ह्यांतील पक्षकार, वकील आणि लोकभावना लक्षात घेऊन कोल्हापुरात खंडपीठ अगर सर्किट बेंच व्हावे ही राज्य सरकारचीच भूमिका आहे. यासाठी आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना आजच पत्र देऊ तसेच शासनाच्या वतीने पाठपुरावा करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मंगळवारी दुपारी विधानभवन येथे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या संयुक्त बैठकीत त्यांनी ही ग्वाही दिली.
विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन खंडपीठ विषयावर प्रदीर्घ चर्चा करत त्यांच्यासमोर लोकभावना मांडल्या. लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळात पालकमंत्री सतेज पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार सर्वश्री ऋतुराज पाटील, अनिकेत तटकरे, अरुण लाड, प्रकाश आबिटकर, शेखर निकम, रणजितसिंह मोहिते-पाटील, जयंत आसगावकर, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, आदींचा सहभाग होता.
बैठकीत सभापती रामराजे निंबाळकर म्हणाले, सहा जिल्ह्यांतील वकील व पक्षकार हे गेल्या ३५ वर्षांपासून खंडपीठासाठी प्रयत्न करत आहेत. सहा जिल्ह्यांतून साडेतीन लाख खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. कोल्हापुरात खंडपीठ झाल्यास पक्षकारांचा वेळ व पैसा याची बचत होणार आहे. हा पक्षकारांसह वकिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सहा जिल्ह्यांतील लोकभावना लक्षात घेता कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे ही राज्य सरकारचीच भूमिका आहे, राज्य सरकार त्यासाठी सकारात्मक आहे. राज्य शासनाच्या वतीने आपण स्वत: मुख्य न्यायमूर्तींना आजच पत्र देऊ. हे खंडपीठ लवकरच होण्यासाठी शासनाच्या वतीने पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
फक्त वकिलांचा नव्हे, सर्वसामान्यांचा प्रश्न : सतेज पाटील
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कोल्हापुरात खंडपीठ स्थापनेबाबत लोकांच्या भावना तीव्र आहेत. हा लढा फक्त वकिलांचा नसून, सर्वसामान्य जनतेचा बनल्याने आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. गेली ३५ वर्षे खंडपीठासाठी लढा सुरू असल्याने आता खंडपीठाशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पटवून दिले.
कृती समितीची उद्या मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा
कोल्हापूर खंडपीठ कृती समिती आणि महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य हे उद्या, गुरुवारी सायंकाळी पाच वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. बैठकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य विवेक घाटगे, वसंतराव भोसले, संग्राम देसाई यांच्यासह कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन व खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष गिरीष खडके, सचिव विजयराव ताटे-देशमुख, आदी सदस्य आज, बुधवारी दुपारी मुंबईला रवाना होत आहेत.