अध्यासनाद्वारे देशमुखांच्या परिचयाचा नवा अध्याय सुरू
By admin | Published: October 19, 2016 12:35 AM2016-10-19T00:35:28+5:302016-10-19T00:35:28+5:30
एन. डी. पाटील : ‘स्वाभिमानी वीज कामगार’तर्फे दहा लाखांचा निधी
कोल्हापूर : तेजस्वी, अभ्यासू, लढाऊ, धाडसी नेतृत्व असलेल्या कॉ. दत्ता देशमुख यांच्या जीवनकार्याची ओळख, परिचय करून देणाऱ्या नव्या अध्यायाचा प्रारंभ शिवाजी विद्यापीठातील त्यांच्या नावाने सुरू होणाऱ्या अध्यासनाद्वारे झाला आहे. देशमुख यांचे कार्य आजच्या नव्या पिढीला आवर्जून सांगण्याचे काम व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी मंगळवारी येथे केले.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे मुखपत्र ‘स्वाभिमानी वीज कामगार’ पुरस्कृत ‘कॉ. दत्ता देशमुख अध्यासन’ शिवाजी विद्यापीठात सुरू करण्यात येत आहे. या अध्यासनासाठीच्या निधी सुपूर्द कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठातील गणितशास्त्र विभागाच्या सभागृहात ‘स्वाभिमानी वीज कामगार’तर्फे दहा लाख रुपयांच्या निधीचा धनादेश ज्येष्ठ विचारवंत प्रा. पाटील यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर, वर्कर्स फेडरेशनचे प्रभारी अध्यक्ष मोहन शर्मा, विद्यापीठाचे बीसीयूडी संचालक डॉ. डी. आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे उपस्थित होते.
डॉ. शिंदे म्हणाले, कॉ. देशमुख यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. विद्यापीठातील हे अध्यासन त्यांच्या सामाजिक, राजकीय, आदी क्षेत्रांतील कार्याचा अभ्यास करणारे विस्तृत व्यासपीठ होईल.
डॉ. चौसाळकर म्हणाले, पुरोगामी चळवळीतील एका कार्यकर्त्याचे देशमुख यांच्या नावाने विद्यापीठात साकारत असलेले हे पहिलेच अध्यासन आहे.
शर्मा म्हणाले, कॉ. देशमुख यांच्या कार्याची भावी पिढीला ओळख करून देण्यास व देशमुख यांची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी हे अध्यासन साकारण्यात येत आहे. के. पी. तांबेकर, प्रा. डॉ. भारती पाटील, आदींसह वीज कामगार उपस्थित होते. ‘स्वाभिमानी वीज कामगार’ मुखपत्राचे संपादक सुरेश परचुरे यांनी स्वागत केले. वीज कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष विनय कोटी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
लढ्यात गुणात्मक फरक
संयुक्त महाराष्ट्राचा लढा, दुष्काळ निर्मूलन समितीवरील कामकाजात कॉ. देशमुख यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा राहिला. तत्कालीन परिस्थितीत त्यांनी उभारलेला उसाच्या किमतीसाठीचा संघर्ष आणि आजच्या परिस्थितीतील त्याच प्रकारचे लढे यांच्यात अत्यंत गुणात्मक फरक असल्याचे दिसून येत असल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले.