फुटबॉलपटूंवर कौतुकाची थाप
By admin | Published: February 4, 2015 12:39 AM2015-02-04T00:39:23+5:302015-02-04T00:40:58+5:30
आंतरजिल्हा विजेतेपद : ‘केएसए’च्यावतीने कोल्हापुरी थाटात सत्कार
कोल्हापूर : हिंगोलीमध्ये झालेल्या आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलेल्या केएसए कोल्हापूर फुटबॉल संघाचे मंगळवारी कोल्हापुरात आगमन होताच संघाचे जंगी स्वागत करण्यात आले. के.एस.ए.च्या टेनिस हॉल येथे कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे पेट्रन-इन-चीफ शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवराज संभाजीराजे, मालोजीराजे छत्रपती, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांची प्रमुख उपस्थिती होती. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्यावतीने हिंगोली इथे आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातील ३२ संघांनी सहभाग घेतला होते. स्पर्धेतील अंतिम सामन्यात कोल्हापूर संघाने नागपूर संघावर मात करीत विजेतेपद पटकाविले होते. के.एस.ए.च्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मिळविलेल्या या यशाबद्दल विजेत्या खेळाडूंना के. एस.ए.च्यावतीने प्रत्येकी दोन हजार रुपयांचे पारितोषिक व ट्रॅक सूट देण्यात आले. याप्रसंगी केएसएचे अध्यक्ष दि. के. अतितकर, दीपक शेळके, माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, सरदार मोमीन, संभाजीराव पाटील-मांगोरे, नील पंडित-बावडेकर, ताज नांद्रेकर, विश्वास मालेकर-कांबळे, दिग्विजय राजेभोसले, संग्रामसिंह यादव, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विशेष निधी...
के.एस.ए. संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेला शाहू छत्रपती महाराज यांनी ३ लाख ७५ हजार रुपये व संस्थेचे कार्यकारिणी उपाध्यक्ष दीपक शेळके यांनी एक लाख रुपयांचा निधी मंगळवारी कार्यक्रमादरम्यान जाहीर केला.
यांचा झाला गौरव...
शकील पटेल (कर्णधार), आकाश भोसले (उपकर्णधार), रणवीर खालकर (गोलकीपर), शरद मेढे (गोलकीपर), अमृत हांडे, अर्जुन साळोखे, श्रेयस मोरे, श्रीधर परब, सचिन बारामती, कपिल साठे, राहुल पाटील, रोहित कुरणे, विकी जाधव, सागर पोवार, सुमित घाटगे, सिद्धेश यादव, आदित्य साळोखे, संदीप पाटील, माणिक पाटील, संदीप पोवार.