कच्च्या मालाचे दर भडकल्याने ‘फौंड्री’थंड

By admin | Published: October 7, 2016 01:08 AM2016-10-07T01:08:13+5:302016-10-07T01:09:18+5:30

उद्योग अडचणीत : पिग आयर्नचे उत्पादन थांबल्याने कमतरता; चीन, आॅस्ट्रेलियातील कोळसा आयात मंदावली

Fondry rhythm by ridding raw material prices | कच्च्या मालाचे दर भडकल्याने ‘फौंड्री’थंड

कच्च्या मालाचे दर भडकल्याने ‘फौंड्री’थंड

Next

सतीश पाटील -- शिरोली -फौंड्रीला लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर गगनाला भिडले आहेत. स्क्रॅप तीन हजार, पिग आयर्न सहा हजार, तर कोळसा बारा हजारांनी वाढला आहे. त्यामुळे फौंड्री उद्योगात खळबळ उडाली असून, उद्योजकांना फौंड्री सुरू ठेवणे अवघड झाले आहे.
सप्टेंबर महिन्यापासून पिग आयर्नची बाजारात कमतरता भासत असल्याने त्याचे दर वाढले, असे उद्योजकांना समजले. पण, होस्पेट येथील किर्लोस्कर कंपनीची फर्नेस युनिट नादुरुस्त होऊ बंद पडली आहे. तसेच सेसा गोवा येथील एक फर्नेस आणि ओरिसा, खडकपूर येथील टाटा मेटेलिक्सची एक फर्नेस नादुरुस्त असल्याने पिग आयर्नचे उत्पादन थांबले आहे. पिग आयर्नचे उत्पादन बंद झाल्याने याचा फायदा गोदामात स्टॉक करून ठेवलेल्या व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
सुरुवातीला एक ते दोन हजारांनी वाढलेले दर प्रतिटन सहा हजारांनी वाढविले आहेत. तर कुपोला फौंड्रीला लागणारा कोकिंग कोळसा हा चीन आणि आॅस्ट्रेलिया येथून आयात होतो; पण गेल्या महिन्यात चीनमधील धोरण बदलले आहे. आॅस्ट्रेलियामधील कोळशाच्या खाणीत पाणी गेल्याने तेथील खाणी बंद आहेत. यामुळे चीन आणि आॅस्ट्रेलियाने कोळशाचे दर प्रतिटन दोन ते अडीच हजारांनी वाढविले आहेत. गुजरातमधील कोळसा व्यापाऱ्यांनी संघटना करून हाच कोळसा भारतात आल्यावर अव्वाच्या सव्वा भावाने विकून देशातील उद्योजकांना वेठीस धरले आहे. त्यांनी कोळशाचे दर प्रतिटन दहा हजारांनी वाढविले आहेत. त्यामुळे १९ हजारांना मिळणारा कोळसा ३१ हजारांवर पोहोचला आहे. कोळसा आणि पिग आयर्नचे दर अचानकपणे वाढल्याने स्थानिक स्क्रॅप व्यावसायिकांनी स्क्रॅपचे दरही वाढविले आहेत. स्क्रॅप २१ हजारांवरून २४ हजारांवर गेला आहे.
फौंड्री उत्पादनांच्या मागणीत वाढ झाली आहे, असेही नाही. त्यामुळे मंदीच्या काळात कच्चा मालाचे दर अचानकपणे वाढल्याने उद्योजकांना मोठा फटका बसत आहे. दर अचानक वाढल्याने ज्या कंपनीचे काम मिळते त्या कंपन्यासुद्धा नगामागे दर वाढवून देत नाहीत. एक तर कामाची मागणी कमी आहे. पंधरा दिवसांवर दिवाळी आली आहे. अशा परिस्थितीमध्ये हा उद्योग चालवणे अडचणीचे ठरत असू जिल्ह्यातील फौंड्री उद्योजक संकटात सापडले आहेत.


सप्टेंबर आणि आॅक्टोबर या दोन महिन्यांत पुन्हा काम कमी आले आहे. आणि कच्चा मालाचे दर अचानकपणे वाढले आहेत. यामुळे फौंड्री उद्योग अडचणी सापडला आहे. आठवड्यातून तीनवेळा दरवाढ होत आहे. कच्चा मालाचे दर वाढल्याने कास्टिंग दर साठ रुपयांवरून सत्तर रुपयांवर जातो आहे. पण, हा वाढीव दर आम्हाला मिळत नाही. त्यामुळे विजेपाठोपाठ पिग आयर्न, कोळसा यांच्या दरात वाढ झाल्याने उद्योजकांना फटका बसला आहे.
- संजय पाटील, अध्यक्ष आय.आय.एफ.


आगदोरच गेल्या चार वर्षांपासून फौंड्री आणि आॅटोमोबाईल उद्योगात मंदी आहे. महिन्याचा कामगार पगार, वीज बिल, पाणी बिल, विविध टॅक्सेस भागविताना उद्योजकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यात कच्च्या मालाचे दर गेल्या महिन्यापासून अचानकपणे वाढले आहेत. पण, मागणी ही नाही आणि दर वाढल्याने उद्योजक मोठ्या संकटात सापडले आहेत.
-संग्राम पाटील, उपाध्यक्ष गोशिमा


ज्या कंपन्यांचे आम्ही काम करतो त्यांच्याबरोबर दर ठरलेले असतात. त्यामुळे कच्च्या मालाचे दर अचानकपणे वाढले म्हणून आम्हाला मोठ्या कंपन्या कास्टिंगला दर वाढवून देत नाहीत. काम लवकर आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही लघू उद्योजकांना जो दर ठरवून काम देतो, त्यांचे दर कमी करू शकत नाही. त्यामुळे फौंड्री उद्योजक मोठ्या संकटात सापडले आहेत. गेल्या दीड महिन्यांपासून अचानकपणे कच्चा मालाचे दर वाढले आहेत. या दरवाढीने फौंड्री उद्योग संकटात सापडला आहे.
-निरज झंवर,फौंड्री उद्योजक.


कोल्हापुरात 300 फौंड्री
कोल्हापूर जिल्ह्यात शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल, हातकणंगले याठिकाणी ३00 फौंड्री उद्योग आहेत. महिन्याला साठ हजार टन कास्टिंग तयार होते. कास्टिंगसाठी १५ हजार टन महिन्याला पिग आयर्न, १५ हजार टन स्क्रॅप, क्युपोला फौंड्रीला कोळसा, 30 हजार टन सँड, बेनटोनाईट यासारखा कच्चा माल लागतो.

Web Title: Fondry rhythm by ridding raw material prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.