रत्नागिरीतील सैन्यभरतीवेळी ‘व्हाईट आर्मी’चे अन्नछत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 01:15 PM2019-11-12T13:15:57+5:302019-11-12T13:19:06+5:30
जीवन मुक्ती सेवा संस्था (व्हाईट आर्मी)च्या वतीने १७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान रत्नागिरीत आयोजित सैन्य भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांना मोफत अन्नछत्राची व्यवस्था केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : जीवन मुक्ती सेवा संस्था (व्हाईट आर्मी)च्या वतीने १७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान रत्नागिरीत आयोजित सैन्य भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांना मोफत अन्नछत्राची व्यवस्था केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सैन्य भरतीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात तरुण येतात. सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांचे भरतीच्या काळात जेवणाखाण्याचे हाल होतात. मुले बिस्कीटे खाऊन, पाणी पिऊन, थंडी वाऱ्यात उपाशी झोपून दिवस काढतात. या मुलांना मोफत जेवण देण्याचा उपक्रम १४ वर्षांपूर्वी व्हाईट आर्मीने सुरू केला.
केवळ कोल्हापुरातच नव्हे, तर सांगली, कवठेमहांकाळ, सोलापूर, फलटण, रत्नागिरी, गोवा येथे सैन्यभरतीवेळी मोफत अन्नछत्र उभा केले होते. आतापर्यंत भारतीय स्थलसेना, वायूसेना, १०९ टी. ए. मराठा, माजी सैनिक हरीत सेना, एफआरडीएफ पोलीस भरतीमध्ये सहभागी झालेल्या साडेपाच लाख तरुणांना अन्नछत्राचा लाभ झाला आहे.
अन्नछत्र चालविण्याची जबाबदारी व्हाईट आर्मीचे जवान करतात. जे जेवण बनविले जाते, ते शिस्तबद्ध पद्धतीने वाटप केले जाते. या अन्नछत्राची सैन्य दलातील मेजर जनरल, जनरल, ब्रिगेडीअर्स, कर्नल, आदी अधिकाऱ्यांनी प्रशंसा केल्याचे रोकडे यांनी सांगितले.
सैन्यभरती मोफत अन्नछत्रास धान्य, आर्थिक स्वरूपात मदत वा सेवा करायची असेल त्यांनी व्हाईट आर्मी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहनही अशोक रोकडे यांनी यावेळी केले.