कुटुंबातील तिघांना अन्नातून विषबाधा; धान्यात कीडनाशक पावडर मारल्याचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 01:02 AM2019-06-11T01:02:40+5:302019-06-11T01:08:04+5:30
जेवण केल्यानंतर उलट्या व जुलाबाचा त्रास होऊन प्रकृती अत्यावस्थ झाल्याने एकाच कुटुंबातील तिघांना नागाळा पार्कातील खासगी रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी तपासणी केल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले.
कोल्हापूर : जेवण केल्यानंतर उलट्या व जुलाबाचा त्रास होऊन प्रकृती अत्यावस्थ झाल्याने एकाच कुटुंबातील तिघांना नागाळा पार्कातील खासगी रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी तपासणी केल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. शिवगोंडा कलगोंडा पाटील (वय ६५, रा. रुईकर कॉलनी, कोल्हापूर), त्यांचा मुलगा आशिष (३६), सून प्रिया (२६) अशी त्यांची नावे आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.
शिवगोंडा पाटील यांचे राजारामपुरीत किराणा मालाचे दुकान आहे. त्यांनी घरातील गोडाऊनमध्ये धान्याचा साठा ठेवला होता. त्यामध्ये किडे होऊ नये म्हणून त्यांनी औषध मारले होते. हेच धान्य ते घरी वापरत असतात. रविवारी जेवण केल्यानंतर शिवगोंडा पाटील, त्यांचा मुलगा व सूनेला उलट्या, जुलाबाचा त्रास होऊन प्रकृती अत्यवस्थ झाली. शेजारील लोकांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी अन्नातून विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले. गोडाऊनमधील धान्यावर प्रमाणापेक्षा जास्त औषध मारल्याचे त्यांच्या लक्षात आले. रात्री जेवणामध्ये त्या धान्याचा अंश राहिल्याने विषबाधा झाल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
जेवण केल्यानंतर उलट्या व जुलाबाचा त्रास होऊन तिघांचीही प्रकृती अत्यावस्थ
धान्यातील किडनाशक पावडरचा जेवणामध्ये अंश राहिल्याने विषबाधा झाल्याची डॉक्टरांना शक्यता
नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज
घरात डब्यामध्ये साठवून ठेवलेल्या धान्यामध्ये किड किंवा आळ्या होऊ नये; यासाठी लोक पावडर टाकत असतात. विशेषत: ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरी हा प्रयोग केला जातो. धान्यामध्ये किती प्रमाणात पावडर टाकायची याचे प्रमाण माहीत असणे गरजेचे आहे. अन्यथा त्यातून विषबाधा होण्याची दाट शक्यता आहे; त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.