Kolhapur: अन्न सुरक्षा अधिकारी लाच घेताना जाळ्यात, वेफर्स व्यावसायिकाकडून घेतली ४५ हजाराची लाच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 12:33 PM2024-08-21T12:33:51+5:302024-08-21T12:34:24+5:30
कोल्हापूर : फुलेवाडी येथे वेफर्स तयार करणाऱ्या व्यावसायिकाला कारवाईची भीती घालून ४५ हजार रुपयांची लाच घेणारा अन्न सुरक्षा अधिकारी ...
कोल्हापूर : फुलेवाडी येथे वेफर्स तयार करणाऱ्या व्यावसायिकाला कारवाईची भीती घालून ४५ हजार रुपयांची लाच घेणारा अन्न सुरक्षा अधिकारी विकास रोहिदास सोनवणे (वय ५०, सध्या रा. प्रतिभानगर, कोल्हापूर, मूळ रा. कर्जत-जामखेड, जि. अहमदनगर) हा रंगेहाथ सापडला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने उमा टॉकीज चौकातील अन्न व औषध प्रशासनच्या कार्यालयात मंगळवारी (दि. २०) दुपारी कारवाई केली. कारवाईने या विभागातील लाचखोरी समोर आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक बापू साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा अधिकारी सोनवणे याने फुलेवाडी येथील वेफर्स व्यावसायिकाच्या फॅक्टरीची पाहणी केली होती. त्यावेळी घेतलेले अन्न पदार्थांचे नमुने सदोष असल्याचे सांगत त्याने कारवाई करण्याची भीती घातली. कारवाई टाळायची असल्यास ४५ हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले.
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. निरीक्षक साळुंके यांनी पडताळणी करून अन्न व औषध प्रशासनच्या कार्यालयात मंगळवारी दुपारी सापळा रचला. त्यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी सोनवणे हा ४५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडला. त्याच्या घराची झडती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.