त्यांच्या कारखान्यात धान्य पिकणार नाही - राजू शेट्टी; शेतमालाला भाव कधी मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 12:46 AM2019-05-13T00:46:00+5:302019-05-13T00:46:25+5:30
अदानी, अंबानी यांच्यासारख्या भांडवलदारांच्या कारखान्यात धान्य पिकणार नाही, तर त्यासाठी शिवारात जावे लागणार आहे. ते पिकविण्यासाठी शेतकरी प्रथम जिवंत राहिला पाहिजे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.
कोल्हापूर : अदानी, अंबानी यांच्यासारख्या भांडवलदारांच्या कारखान्यात धान्य पिकणार नाही, तर त्यासाठी शिवारात जावे लागणार आहे. ते पिकविण्यासाठी शेतकरी प्रथम जिवंत राहिला पाहिजे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.
कोल्हापुरात एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांनी पिकविलेले धान्य, भाजी स्वस्तात मिळावी ही अपेक्षा करणे यामध्ये परिवर्तन झाले पाहिजे. शेतकऱ्यांनी काय करायचे हे तो ठरवू शकत नाही. ते अन्य ठरवतात. ही शोकांतिका असून, तो या चक्रव्यूहामध्ये अडकला आहे. साहित्य क्षेत्रामध्ये शेतकºयांचे प्रश्न क्वचितच मांडले जातात.
संस्कृतीचा घटक
सध्या दुष्काळामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तशीच परिस्थिती भविष्यात अन्नासाठी करावी लागेल. अशी संहारक परिस्थिती निर्माण व्हायची नसेल, तर आज शेतकºयाला सर्वांनी मिळून जगविण्याची गरज आहे. शेतकरी हा संस्कृतीचा घटक मानला गेला तर त्याचे अनेक प्रश्न सामूहिकरित्या सोडवता येतील, असे त्यांनी सांगितले.