आरोग्य, आनंदासाठी फुटबॉल आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 11:54 PM2017-09-14T23:54:45+5:302017-09-14T23:56:50+5:30

भारतात आॅक्टोबरमध्ये सतरा वर्षांखालील फिफा युवा फुटबॉल चषक प्रथमच होत आहे.

 Football is essential for health and happiness | आरोग्य, आनंदासाठी फुटबॉल आवश्यक

आरोग्य, आनंदासाठी फुटबॉल आवश्यक

googlenewsNext
ठळक मुद्देया स्पर्धेत भारताकडून कोल्हापूरचा एकमेव फुटबॉलपटू अनिकेत जाधव खेळणार राज्यातील सर्व शाळांमध्ये एकाचवेळी दहा लाखांहून अधिक मुले-मुलींच्या फुटबॉल स्पर्धा खेळविण्याचा निर्णय शाळा १४, १७ व १९ वर्षांखालील संघांना प्रोत्साहन देत आहेत.

भारतातआॅक्टोबरमध्ये सतरा वर्षांखालील फिफा युवा फुटबॉल चषक प्रथमच होत आहे. या स्पर्धेत भारताकडून कोल्हापूरचा एकमेव फुटबॉलपटू अनिकेत जाधव खेळणार आहे. संघाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने आज, शुक्रवारी राज्यातील सर्व शाळांमध्ये एकाचवेळी दहा लाखांहून अधिक मुले-मुलींच्या फुटबॉल स्पर्धा खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’अंतर्गत महाराष्ट्र फुटबॉलमय होईल. भारताच्या फुटबॉलच्या नकाशावर ‘कोल्हापूर’चेही आगमन होईल. त्या अनुषंगाने कोल्हापूरचा राष्ट्रीय फुटबॉलपटू सागर चिले याच्याशी साधलेला थेट संवाद

प्रश्न : राष्ट्रीय फुटबॉलच्या तुलनेत कोल्हापुरी फुटबॉलची तुलना कशी होईल?
उत्तर : पुढील महिन्यात भारतात होणाºया फिफा सतरा वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत प्रथमच भारताला संधी मिळत आहे. त्यात ‘विशेष बाब’ म्हणून कोल्हापूरचा युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधवही अकराच्या संघात खेळणार आहे. खेळाडू घडविणाºया १४, १७ आणि १९ वर्षांखालील स्पर्धांमध्ये म्हणावे तितके ना प्रशिक्षकांनी, ना पालकांनी लक्ष दिले आहे. त्यातून तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळाडूंची शारीरिक तंदुरुस्ती, परदेशी प्रशिक्षक आणि प्रोत्साहन देणाºया आस्थापना यांची वानवा आहे. त्यासह शंभर वर्षांची परंपरा लाभलेल्या कोल्हापूरला एकही व्यावसायिक संघ निर्माण करता आलेला नाही. त्यामुळे स्थानिक लढाईत आपले गडी बाद होतात. एकूणच प्रसिद्धीचे वलय असलेल्या कोल्हापुरी फुटबॉलला तंत्रशुद्ध, तंदुरुस्त, पूर्णवेळ खेळू शकणारे खेळाडू बनविणाºया फॅक्टरीची गरज आहे.

प्रश्न : राज्य शासनाच्या ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’चा फुटबॉलच्या विकासासाठी कितपत उपयोग होईल?
उत्तर : मागील काही वर्षांत सरकारकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य राज्यातील फुटबॉलला म्हणावे तितके लाभले नाही. सुदैवाने भारतात सतरा वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा होत आहेत. त्यात कोल्हापूरचा अनिकेत खेळणार आहे. यासह तो ‘महाराष्ट्राचा फुटबॉल आयडॉल’ म्हणून क्रीडा खात्याने नियुक्त केला आहे. याचा कोल्हापूर फुटबॉल विश्वाला निश्चितच फायदा होणार आहे. कारण राज्याचे सोडाच, पण कोल्हापुरातही किती शाळांमध्ये मुलींच्या फुटबॉलला प्रोत्साहन दिले जाते, हा संशोधनाचा विषय होता. आता मात्र ही परिस्थिती झपाट्याने सुधारणार आहे. कारण राज्याच्या क्रीडा खात्याने फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने लाखो फुटबॉल प्रोत्साहनपर शाळांमध्ये वाटून खेळाविषयी गोडी निर्माण करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. त्यातून अनेक फुटबॉलपटू राज्याला व देशाला मिळतील. भारतात नवी दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी, कोचीसह महाराष्ट्रातही नवी मुंबई व लगतचे राज्य गोवामध्येही या स्पर्धेतील काही सामने होणार आहेत.

प्रश्न : स्थानिक फुटबॉल स्पर्धांमधून एकूणच फुटबॉल खेळाचा दर्जा का वाढत नाही ?
उत्तर : कोल्हापूरच्या अनेक खेळाडूंमध्ये कौशल्य आहे; पण मुंबई, पुणे, गोवा येथे जाऊन निवड चाचणी देण्याचे धाडस होत नाही. यासह पालकांच्या हट्टापायी अनेक होतकरू व दर्जेदार खेळाडू आपले गाव सोडायला तयार नाहीत. त्यात पेठा-पेठांमधील ईर्ष्या आजही अनेकांच्या मनात घर करून बसली आहे. समर्थक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद हाही कोल्हापुरात राहण्यासाठी अनेकांना चांगला वाटतो. फुटबॉलला पोषक वातावरण असले तरी अनेकांना नियमांची जाण नाही. खेळांतील धसमुसळेपण आणि बेशिस्तही स्थानिक खेळ न वाढण्यामागे आहे. अनेकजण चॅम्पियन लीग, युरोपियन लीग स्पर्धा पाहतात. मात्र, भारतात होणाºया संतोष चषक, ड्युरंड कप, आदी स्पर्धा पाहत नाहीत. हाही एक दोषच म्हणावा लागेल. भारतीय फुटबॉल कितपत आणि कुठल्या पातळीवर आहे याची जाणीव खेळाडूंमध्ये होणे आवश्यक आहे.

प्रश्न : राज्य, राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये तू कोणत्या संघाकडून खेळला आहेस?
उत्तर : मी स्थानिक पातळीवर प्रॅक्टिस फुटबॉलचे प्रतिनिधित्व करतो, तर यापूर्वी मी एअर इंडियाकडून देशातील मानाचा ड्युरंड कप, कलिंगा कप, मिलियन कप, ११० वर्षांची परंपरा असलेला मुंबईतील नाडकर्णी कप स्पर्धेत खेळलो आहे, तर आर.सी.एफ. या संघाकडूनही मुंबई लीग स्पर्धा खेळली आहे. याशिवाय शालेय स्तरावर महाराष्ट्राचे दिल्लीत दोनवेळा प्रतिनिधित्व केले आहे. यासह शिवाजी विद्यापीठाचे अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावर दोनवेळा प्रतिनिधित्व केले आहे.

प्रश्न : एका फुटबॉलपटूला आहार शास्त्र कसे सांभाळावे लागते?
उत्तर : पंचेचाळीस मिनिटांच्या दोन सत्रांत खेळताना फुटबॉलपटूंचा शारीरिक कस लागतो. याकरिता शरीर तंदुरुस्त व ऊर्जात्मक ठेवण्यासाठी भरपूर पालेभाज्या, फळे, दूध, आदींचा वापर करणे गरजेचे आहे. यासह मसालेदार पदार्थ खाणे वर्ज केले पाहिजे. स्पर्धेच्या प्रेमापेक्षा सरावावर अधिक भर देणे गरजेचे आहे. त्यात नियमित झोपही आवश्यक आहे. रात्री नऊनंतर पूर्ण विश्रांती आवश्यक आहे. शरीर एका धावपटूसारखे सडपातळ असणे गरजेचे आहे. विश्रांतीच्या काळात पाणी भरपूर पिणे आवश्यक आहे.

प्रश्न : भारतात होणाºया सतरा वर्षांखालील फिफा स्पर्धेविषयी थोडंसं?
उत्तर : जागतिक फुटबॉल क्रमवारीत आपली सुधारणा झाली असून, आपण आॅगस्ट अखेर ९७ व्या क्रमांकावर आहोत. असाच खेळ करत राहिलो तर आपण पहिल्या दहामध्ये येत्या काही वर्षांत येऊ. भारतात होणाºया फिफा विश्वचषक स्पर्धेत आपला मुकाबला अमेरिका, कोलंबिया, घाना यांच्याशी गु्रप ‘ए’ मध्ये आहे, तर स्पर्धेत माली, तुर्की, पॅराग्वे, न्यूझीलंड हे गु्रप ‘बी’मध्ये, तर गु्रप ‘सी’मध्ये इराण, गुनिया, जर्मनी, कोस्टारिका, गु्रप ‘डी’मध्ये ब्राझील, नायझेर, स्पेन, कोरिया (डीपीआर), गु्रप ‘ई’मध्ये फ्रान्स, न्यू कॅलेडिनोइया, जपान, हुंडारस व गु्रप ‘एफ’मध्ये इंग्लंड, मेक्सिको, इराक, चिली हे देश सामील आहेत. विशेष म्हणजे ‘फिफा’ने जाहीर केलेल्या उत्कृष्ट खेळाडूंच्या क्रमवारी यादीत अनिकेतचा समावेश आहे.

प्रश्न : स्थानिक पातळीवर शालेय स्तरावर कोणत्या शाळा फुटबॉलला प्रोत्साहन देतात.
उत्तर : कोल्हापूरच्या एकूणच फुटबॉलला शाहू छत्रपती, खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे, के.एस.ए.ने राजाश्रय दिला आहे. त्यामुळे हा टिकून आहे. शालेय पातळीवर महाराष्ट्र हायस्कूल, छत्रपती शाहू विद्यालय, सेंट झेविअर्स हायस्कूल, पोदार इंटरनॅशनल, संजीवन पब्लिक स्कूल, पन्हाळा पब्लिक स्कूल, शांतिनिकेतन, डी. सी. नरके विद्यानिकेतन, तर मुलींमध्ये आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, आदी शाळा १४, १७ व १९ वर्षांखालील संघांना प्रोत्साहन देत आहेत.
- सचिन भोसले

Web Title:  Football is essential for health and happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.