‘फुटबॉल पंढरी’ स्तब्ध, कोल्हापुरात महान फुटबॉलपटू पेलेंना आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 12:02 PM2022-12-31T12:02:35+5:302022-12-31T12:05:11+5:30
यावर्षी चिल्लर पार्टीने वाढदिनी ‘द बर्थ ऑफ लिजंड : पेले’ चित्रपट दाखविला होता
कोल्हापूर : ‘फुटबॉलचा राजा’ असणारे पेले हे कोल्हापूर या फुटबॉल पंढरीचे ‘आयकॉन’ होते. खेळातील त्यांचे कौशल्य पाहून १९८० च्या दशकात अनेक फुटबॉलपटू घडले. खेळाडू, शौकिनांचे पेले यांच्यावर जीवापाड प्रेम होते. त्यांचा वाढदिवस आणि वर्ल्डकप, अन्य स्पर्धांतील दणकेबाज कामगिरीचा आनंदोत्सव मोठ्या जल्लोषात केला जायचा.
शंभर वर्षांची परंपरा असलेल्या कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्राने पाश्चिमात्य देशातील खेळाडूंना आयकॉन, आयडॉल मानले. त्यात पेले अग्रस्थानी राहिले. त्यापाठोपाठ रोनाल्डो, मेस्सी, नेमार, गॅब्रियल जीजस आदी खेळाडू आहेत. साधारणत: १९७० आणि ८० च्या दशकात पेले यांचा खेळ पाहून, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन कोल्हापुरात नवोदित फुटबॉलपटूंमधून अनेक खेळाडू घडले. पेले हे त्यांचे दैवत बनले. काहींनी त्यांची छायाचित्रे घरात रेखाटली. वर्तमानपत्रांतील त्यांच्या छायाचित्र, बातम्यांचे संग्रह केले. मोठे फलक लावून दि. २३ नोव्हेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.
यावर्षी चिल्लर पार्टीने वाढदिनी ‘द बर्थ ऑफ लिजंड : पेले’ चित्रपट दाखविला होता. यंदाच्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये रायगड कॉलनीतील तुषार घाडगे या फुटबॉलशौकिनाने स्वत:च्या घराच्या भिंतीवर पेले यांचे सुंदर छायाचित्र रेखाटले होते. अशा विविध पद्धतीने पेले यांच्या स्मृती कोल्हापुरात चिरंतनपणे राहणार आहेत.
फुटबॉल खेळाडू, संघटक सांगतात...
पेले हे फुटबॉलचे राजा होते. त्यांचे आम्ही सर्व खेळाडू मोठे चाहते होतो. त्यांच्या निधनाने एका महान खेळाडूला जग मुकले आहे. त्यांचा आदर्श कायम ठेवून कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाडूंनी कार्यरत राहणे हीच त्यांनी मोठी आदरांजली ठरणार आहे. -अरुण नरके, ज्येष्ठ फुटबॉलपटू
पेले यांच्यावर कोल्हापुरातील खेळाडूशौकिनांचे जीवापाड प्रेम होते. त्यांचा खेळ पाहून माझ्यासारखे अनेक खेळाडू घडले. ते फुटबॉलमधील जादूगार होते. -श्रीनिवास जाधव, अध्यक्ष, कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशन
ज्येष्ठ फुटबॉलपटू पेले यांचा खेळ आम्ही यू-ट्यूबरील जुने व्हिडीओ पाहून आणि कोल्हापुरातील ज्येष्ठ खेळाडूंच्या माध्यमातून ऐकून समजून घेतला. ते आमचे कायमस्वरूपी आयकॉन आहेत. -सचिन पाटील, कर्णधार, दिलबहार तालीम मंडळ
पेले हे जागतिक पातळीवरील फुटबॉलचे राजा होते. त्यांनी सर्वसामान्यांना फुटबॉलची ओळख करून दिली. त्यांनी या क्षेत्रातील नवोदितांना वेगवेगळ्या कौशल्यांद्वारे मार्गदर्शन केले. -बाबूराव घाटगे, ज्येष्ठ फुटबॉलपटू