व्यावसायिकता स्वीकारली तरच फुटबॉलची प्रगती- हेन्री मेनेंझिंज यांचे कोल्हापुरात रेसिडेन्सी क्लब येथे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:39 PM2017-11-27T23:39:07+5:302017-11-27T23:43:24+5:30
कोल्हापूर : अन्य खेळांप्रमाणेच फुटबॉलसाठी कोल्हापुरात पोषक वातावरण आहे. मात्र, कोल्हापूरकरांना त्यांची क्षमता माहीत नाही. काळाची गरज ओळखून आता कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आणि सर्व फुटबॉल संघांनी व्यावसायिकतेचा स्वीकार केला पाहिजे तरच
कोल्हापूर : अन्य खेळांप्रमाणेच फुटबॉलसाठी कोल्हापुरात पोषक वातावरण आहे. मात्र, कोल्हापूरकरांना त्यांची क्षमता माहीत नाही. काळाची गरज ओळखून आता कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आणि सर्व फुटबॉल संघांनी व्यावसायिकतेचा स्वीकार केला पाहिजे तरच कोल्हापूरच्या फुटबॉलची प्रगती होईल, असे मत वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे मुख्य कार्यकारी हेन्री मेनेंझिंज यांनी व्यक्त केले.
कोल्हापुरात सुरू असलेल्या इंडियन वूमेन्स लीग पात्रता फेरीतील सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी कोल्हापुरात आले असता, सोमवारी रेसिडेन्सी क्लब येथे आयोजित वार्तालापात त्यांनी आपले मत व्यक्त केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत ‘विफा’चे सेक्रेटरी सॉव्हर वॉल्टस, ‘विफा’चे उपाध्यक्ष मालोजीराजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेन्री म्हणाले, शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्यामध्ये फुटबॉल रूजला पाहिजे, दर्जेदार प्रशिक्षण तयार झालेच पाहिजे या गोष्टींसह आता चांगले पंच तयार होणे ही काळाची गरज बनली आहे. यासह प्रत्येक संघ, क्लबनी आधुनिक बदल स्वीकारणाची मानसिकता केली पाहिजे. केवळ स्थानिक पातळीवर न अडकता सोशल मीडियांमधून त्यांचे मार्केटिंग करणे गरजेचे बनले आहे. कोल्हापूर फुटबॉलच्या नकाशावर फक्त अनिकेत जाधव किंवा सुखदेव पाटील घडून उपयोग नाही. यांच्यासारखे अनेक खेळाडू तयार झाले पाहिजेत. कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन आणि सर्व संघांनी व्यावसायिकतेचा अंगीकारणे गरजेचे आहे. खेळात व्यावसायिकता आल्याशिवाय खेळाडूंना त्यांचा फायदा होणार नाही.
‘विफा’चे सेक्रेटरी सॉव्टर वॉल्टस म्हणाले, विफा सर्व जिल्'ांमध्ये फुटबॉल पोहोचविण्यासाठी काम करत आहे. प्रत्येक शाळेमध्ये प्रशिक्षित फुटबॉल प्रशिक्षक असणे आवश्यक आहे. सध्या सामन्यांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर पंचांची संख्याही वाढणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टींकडे आम्ही सध्या लक्ष केंद्रीत केले आहे. महिलांच्या फुटबॉलला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
कोल्हापूरच्या फुटबॉलवर लवकरच परिसंवाद
येत्या एक-दोन महिन्यांत कोल्हापूरच्या फुटबॉलचा दर्जावाढीसाठी स्थानिक संघांचे पदाधिकारी, खेळाडू, उद्योजक व बाहेरील संघांचे पदाधिकाºयांच्यासमवेत फुटबॉल परिसंवाद घेण्यात येणार आहे. त्यामधून कोल्हापूर फुटबॉलच्या विकासासाठी नक्कीच चालना मिळेल. यासह सेकंड डिव्हीजन लीगसाठी कोल्हापूरचा संघ तयार करण्याचा प्रयत्न सुरू केले जातील तसेच १४ वर्षांखालील लिग स्पर्धा लवकरच सुरू केली जातील, असे ‘विफा’चे उपाध्यक्ष मालोजीराजे यांनी वेळी सांगितले.