कोल्हापुरातील फुटबॉल हंगाम लवकरच सुरू, मालोजीराजेंनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 01:35 PM2022-12-24T13:35:17+5:302022-12-24T13:57:44+5:30
त्यामुळे स्पर्धा पुन्हा पुढे ढकलली. मात्र, लवकरच पुढील तारीख जाहीर करून हंगाम सुरू केला जाईल
कोल्हापूर : संतोष ट्रॉफी निवड चाचणी, आंतर जिल्हा स्पर्धा आणि पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठीय फुटबॉल स्पर्धांमध्ये के.एस.ए. नोंदणी झालेल्या बहुतांशी संघातील खेळाडूंचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. त्यामुळे लीग स्पर्धेची सुरुवात तूर्तास पुढे ढकलावी, अशी विनंती संघांनी केली होती. त्यानुसार पुन्हा स्पर्धा पुढे ढकलली. लवकरच पुढील तारीख जाहीर करून हंगाम सुरू केला जाईल, अशी माहिती के.एस.ए अध्यक्ष व एआयएफएफचे सदस्य मालोजीराजे यांनी शुक्रवारी दिली.
मालोजीराजे म्हणाले, कोल्हापूरच्या परिघाबाहेर जाऊन फुटबाॅलकडे पाहण्याची नवी दृष्टी कोल्हापुरातील संघांनी आणि खेळाडूंनी बाळगली पाहिजे. संतोष ट्रॉफी स्पर्धेतील एक सामन्यातील सहभागही एखाद्या खेळाडूचे करियर घडवतो. त्याला रेल्वे, पोस्ट, कस्टम, आयकर, आरसीएफ, लष्करांमध्ये नोकरीसाठी उपयोगी आहे. याशिवाय चमकदार कामगिरी केल्यास राष्ट्रीय संघांचेही प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळते. त्यामुळे स्थानिक स्पर्धा महत्त्वाच्या आहेत.
त्यापेक्षाही संतोष ट्राॅफी स्पर्धा खेळाडूंच्या दृष्टीने जास्त महत्त्वाच्या आहेत हे ध्यानात घ्या.
फुटबॉल लीगची खेळाडूंसह संघ नोंदणी १५ नोव्हेंबरला पूर्ण झाली. प्रथम ४ डिसेंबरला हंगाम सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. यामध्ये आंतरविद्यापीठीय फुटबाॅल स्पर्धामध्ये बहुतांशी संघातील खेळाडू सहभागी होणार असल्याने संघांच्याच प्रतिनिधींनी स्पर्धेची पुढील तारीख ठरवावी, अशी विनंती केली.
त्यानंतर संतोष ट्रॉफी निवड चाचणी, पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय स्पर्धा, आंतर जिल्हा स्पर्धांमुळे खेळाडू अजूनही कोल्हापूर बाहेर आहेत. त्यामुळे संघांच्याच विनंतीवरून हंगामाची सुरुवात पुन्हा पुढे ढकलली. त्यामुळे संघांचे आर्थिक नुकसान होत आहे. कोणत्याही संघाला, खेळाडूला वा व्यक्तीला के.एस.ए.ने कधीच झुकते माप दिलेले नाही. समर्थकांनी मात्र सोशल मीडियावर गैरसमज पसरवू नयेत.