‘शिवछत्रपती’ पुरस्कारांमध्ये ‘फुटबॉल’ उपेक्षितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:25 AM2018-02-15T00:25:06+5:302018-02-15T00:25:29+5:30
सचिन भोसले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सर्व खेळांना समान न्याय असतानाही फुटबॉलला यंदाही नियमावली दाखवून ‘शिवछत्रपती’ पुरस्कारापासून उपेक्षित ठेवण्याचे काम राज्याच्या क्रीडा खात्याने केले आहे. यंदाही खात्याने हाच राग आळवल्याने फुटबॉल प्रशिक्षकांनी प्रस्तावच सादर केले नाहीत. त्यामुळे यंदाही फुटबॉलपासून हा पुरस्कार दूरच राहिला.
राज्य शासनातर्फे दरवर्षी खो-खो, कबड्डी, हँडबॉल, आट्यापाट्या, बास्केटबॉल, क्रिकेट, हॉकी, व्हॉलिबॉल, फुटबॉल, कराटे, कुस्ती अशा खेळांमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणाºया खेळाडूंचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करते. त्यात खेळाडू घडविणाºया प्रशिक्षक, मार्गदर्शक व संघटकांनाही पुरस्कार देऊन गौरव करते. त्यात सांघिक खेळांमध्ये किमान दहा खेळाडू राष्ट्रीय पातळीवर खेळलेले असावेत, असा निकष लावण्यात आला आहे. हा निकष इतर खेळात लागू पडू शकतो. मात्र, फुटबॉल त्याला अपवाद ठरत आहे. एखाद्या प्रशिक्षकाला महाराष्ट्रासारख्या राज्यातून फुटबॉलमधून एक खेळाडू घडविताना किती कष्ट घ्यावे लागतील, याचा विचारच न केलेला बरा. आॅक्टोबर २०१७ मध्ये भारतात झालेल्या युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत राज्याचा एकमेव फुटबॉलपटू अनिकेत जाधव भारताकडून खेळला.
त्याला घडविण्यात मोलाचा वाटा असलेले पुण्याचे प्रशिक्षक जयदीप अंगीरवाल हेही ‘शिवछत्रपती’ पुरस्कारापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे अंगीरवाल हे वीस वर्षांपूर्वी महाराष्ट्राने पटकाविलेल्या संतोष ट्रॉफी विजेत्या संघातील खेळाडू आहेत. त्याबरोबरच अनिकेत जाधवसह मोहन बागानकडून खेळणारा निखिल कदम, २३ वर्षांखालील भारतीय संघातील गोलरक्षक सुखदेव पाटील याच्यासह अनेक खेळाडू घडविले आहेत, तरीही क्रीडा खात्याच्या लेखी १० वरिष्ठ गटातील खेळाडू घडविणे गरजेचे आहे. हाच निकष फुटबॉलमध्ये लावल्यास एकाही फुटबॉल प्रशिक्षकास हा पुरस्कार मिळणे कठीण आहे.
कोल्हापूर, मुंबईत तंत्रशुद्ध फुटबॉल प्रशिक्षण हवे
जगातील २०७ देशांमध्ये फुटबॉल खेळला जातो. कोलकाता, गोवा या शहरानंतर कोल्हापुरातही हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. त्यात रसिकांसह खेळाडूंची खाणही याच कोल्हापुरात आहे, तरीही क्रीडा खात्याच्या क्रीडाप्रबोधिनीत सर्व खेळांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळते. मात्र, फुटबॉलचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळत नाही. राज्यात सद्य:स्थितीत एकूण १३ क्रीडाप्रबोधिनी आहेत. त्यातील पुणे येथील बालेवाडीमध्येच फुटबॉलचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळते. हीच सोय कोल्हापूर, नागपूर, मुंबई येथे मिळाली तर महाराष्ट्रातून अनेक फुटबॉलपटू देशाला मिळतील. खेळाच्या प्रसारासाठी अशीही अपेक्षा अंगीरवार यांनी बोलून दाखविली.