मराठा सर्वेक्षण: आमची जात दारावरच्या पाटीवर दिसत नाही काय?; कर्मचाऱ्यांना बरे-वाईट अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 03:55 PM2024-01-31T15:55:29+5:302024-01-31T15:55:43+5:30
माहिती देतानाही अनेक जण ‘उपकार’ करत असल्यासारखी माहिती देत असल्याचा अनुभव
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी म्हणून खुल्या प्रवर्गातील सर्वांचेच सर्वेक्षण सध्या जिल्ह्यात साडेसात हजार शासकीय कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. प्रत्येक खुल्या गटाच्या घरात जाऊन त्यांना १८२ प्रश्न विचारावे लागत आहेत, परंतु त्याची माहिती देतानाही अनेक जण ‘उपकार’ करत असल्यासारखी माहिती देत असल्याचा अनुभव काहींना येत आहे. ‘आमची जात दारावरच्या पाटीवर दिसत नाही काय?’ चक्क अशी विचारणा एका शिक्षकाला करण्यात आली आहे. ग्रामीण भागात मात्र परिस्थिती वेगळी आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने सरकार जागे झाले आणि त्यांनी दिलेले वेळापत्रक पूर्ण करताना सरकारची दमछाक सुरू झाली. सरकार कोंडीत सापडले की, ते शासकीय कर्मचाऱ्यांनाच ‘खिंडीत’ पकडणार. त्यानुसार, जिल्ह्यातील साडेसात हजार जणांना कामाला लावण्यात आले आहे. त्यांना प्रभाग वाटून देण्यात आले आहेत. रोज १५ घरांची माहिती भरण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, परंतु ही माहिती भरतानाही अनेकांची दमछाक होत आहे.
कारण खुल्या प्रवर्गातील घरातील सदस्याची माहिती भरताना एका घराला किमान अर्धा तास लागत आहे. ही माहिती घेऊन ती अपलोड करावी लागते. सही स्कॅन करून घ्यावी लागते. उलट आरक्षित जाती, जमातीच्या सदस्यांना फक्त तीनच प्रश्न विचारावे लागत असल्याने हे काम पटदिशी होते, परंतु कर्मचाऱ्यांना असे विविध अनुभव येत आहेत की, सर्वेक्षण करणारेही हैराण झाले आहेत.
अशी होते विचारणा
- तुम्ही कशासाठी आला आहात, तुम्हाला हे कुणी करायला सांगितलं आहे?
- तुमच्या गळ्यातील आय कार्ड खरं कशावरून?
- फक्त मराठ्यांचं सर्वेक्षण करायचं, असा जीआर आमच्याकडे आहे, तुम्ही आम्हाला माहिती कशाला विचारताय?
- आमचं ‘मराठा’ म्हणून नाव घालू नका, कुणबी म्हणून घाला, म्हणजे आम्हाला प्रमाणपत्र मिळेल.
- आरक्षण असलेले विचारतात की, आमची माहिती कशाला घेताय?
- अनेक वेळा दारच उघडले जात नाही, घरात मालक नाही, म्हणून सांगितले जाते.
- झोपमोड कशाला करताय, म्हणून खेकसण्याचेही प्रकार
महिलांची स्वच्छतागृहांची अडचण
अनेक महिला कर्मचारी, शिक्षिका या सर्वेक्षणात आहेत, परंतु त्यांना स्वच्छतागृहाची अडचण निर्माण होते. अखेर एखाद्या घरातील रागरंग पाहून, एखादा वयस्कर महिलेला विनंती केली जाते. सकाळची शाळा करून हे सर्वेक्षण करताना शिक्षक फेसाटायला लागले आहेत.
पुरुष सर्वेक्षक गल्लीत, महिला उपनगरात
महापालिका आणि पर्यवेक्षकांनी सर्वेक्षकांना प्रभाग देताना अजिबात विचार न केल्यासारखी परिस्थिती आहे. पुरुष शिक्षकांना गल्लीतील, पेठांमधील सर्वेक्षण दिले आहे, तर अनेक महिला या उपनगरामध्ये, नव्या वसाहतींमध्ये सर्वेक्षणासाठी पाठविल्या आहेत.
चहा घेणार का, जेवायला आमच्यात बसा
सर्वेक्षण करताना सगळेच अनुभव वाईट नाहीत. अनेक ठिकाणी चहा घेणार का, म्हणून विचारले जाते. आमच्याच घरात जेवायला बसा, म्हणून विनंती केली जाते. पार्किंगमध्ये डबा खायला कर्मचारी बसणार असतील, तर खुर्च्या दिल्या जातात, असे चांगले अनुभवही सर्वेक्षकांना येत आहेत.