Kolhapur News: निसर्गाचा असहकार.. किरणोत्सवाला नकार; गेल्या पाच वर्षात प्रथमच खंड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 04:23 PM2023-02-04T16:23:36+5:302023-02-04T16:24:37+5:30
पुढील किरणोत्सवासाठी नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार
कोल्हापूर : वातावरणाने पुकारलेल्या असहकारामुळे यंदा गेल्या पाच सात वर्षात प्रथमच करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा किरणोत्सव झाला नाही. यामुळे निसर्ग देवता आणि शक्तिदेवतेच्या भेटीचा सोहळा भाविकांना अनुभवता आला नाही. आता पुढील किरणोत्सवासाठी नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
वर्षातून दोनदा होणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा किरणोत्सव ३० जानेवारीपासून सुरू झाला. त्याआधी दोन दिवस केलेल्या पाहणीदरम्यान किरणे देवीच्या मूर्तीच्या खांद्यापर्यंत आली होती. पण नेमक्या किरणोत्सवाच्या मुख्य तारखांनाच यंदा किरणोत्सव झाला नाही. कितीही ढगाळ वातावरण असले तरी किमान किरणे चरणस्पर्श करतात किंवा कमरेपर्यंत येऊन लुप्त होतात.
यंदा मात्र ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी या महत्वाच्या चार दिवसांत सूर्यकिरणे मंदिरापर्यंतदेखील पोहोचू शकली नाहीत. फार तर गरुड मंडप किंवा गणपती चौक एवढाच पल्ला किरणांनी गाठला. पितळी उंबऱ्यातून आतदेखील आली नाहीत. त्यामुळे किरणोत्सव न होण्यास ज्या प्रमाणात अडथळे कारणीभूत आहेत त्याचप्रमाणात निसर्गाचा मूडही जबाबदार असल्याचे दिसून आले.
अंबाबाईचा किरणोत्सव आणि सूर्यकिरणे हा पूर्णत: निसर्ग सोहळा आहे त्यामध्ये अडथळा येऊ नये याची काळजी फक्त घेता येते पण निसर्गापुढे काही चालत नाही. सूर्यासमोर ढग आले, ढगाळ वातावरणामुळे किरणांची तीव्रता कमी झाली, वातावरणातील प्रदूषण, थंडीमुळे धुके अशा कारणांमुळे नव्या वर्षातील पहिला किरणोत्सव झाला नाही. आता पुढच्या किरणोत्सवासाठी नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे.