Kolhapur- बाळूमामांच्या खजिन्यावर डल्ला: कोप नको म्हणून, व्यवहारांकडे साऱ्यांचीच डोळेझाक
By इंदुमती सूर्यवंशी | Published: November 2, 2023 12:00 PM2023-11-02T12:00:40+5:302023-11-02T12:00:54+5:30
ट्रस्टवर २० वर्षे एकाधिकारशाही : पदाधिकाऱ्यांकडून मात्र साम, दाम, दंडाचा वापर
इंदुमती गणेश
कोल्हापूर : बाळूमामा देवालय ट्रस्ट स्थापन झाल्यापासून गेली २० वर्षे एकाही नव्या विश्वस्ताची नियुक्ती न करता दिवंगत कार्याध्यक्ष व मानद अध्यक्षांनी एकाधिकारशाहीने मनमानी कारभार केल्याची तक्रार बाळूमामांच्या भक्तांनी केली आहे. या वादातून गेल्या काही महिन्यांत तक्रारदारांसोबत भररस्त्यात हाणामारी, सरपंचांना धमकावणे, कर्मचाऱ्यांवर दबाव टाकणे असे अनेक प्रकार झाले आहेत. त्यातून धर्मादाय उपायुक्तांकडे तक्रारी झाल्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालातील भ्रष्टाचाराचे कोट्यवधींचे आकडे बघून भाविकांचे डोळे पांढरे झाले आहेत.
बाळूमामांनी ४ सप्टेंबर १९६६ साली आदमापुरात समाधी घेतली. त्यानंतरचे उत्सव, भंडारा, बकरी व्यवस्थापन असा सर्व कारभार भक्तांकडून चालविला जात होता. पुढे धर्मादाय अंतर्गत २००३ साली ट्रस्ट स्थापून त्यावर महाराष्ट्र व कर्नाटकातील १९ जणांचे विश्वस्त मंडळ तयार झाले. तेव्हापासून आजवर विश्वस्तांनीच एकाधिकारशाहीने कारभार केला आहे. या काळात सहा विश्वस्तांचा मृत्यू झाला, एकाने राजीनामा दिला. त्यांच्या जागी दुसऱ्याची जाणीवपूर्वक नियुक्ती केली गेली नाही.
बाळूमामा म्हटले की भाविकांमध्ये श्रद्धायुक्त भीती आहे, चुकलो की मामा शिक्षा करतात, अशी धारणा असल्याने यात पडायला नको रे बाबा या मानसिकतेतून भाविकांसह ग्रामस्थांनीही ट्रस्टच्या कारभारात लक्ष घातले नाही. भ्रष्टाचाराकडे बघायचेच नाही म्हणून डोळे मिटून घेतले. इतक्या वर्षांनी २०२० पासून अंतर्गत वाद व गटबाजीमुळे गैरकारभार बाहेर येऊ लागला. धर्मादाय उपायुक्त कार्यालयाकडे तक्रारी झाल्या. त्याची दखल घेत चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या चौकशी अहवालानंतर उघड झालेल्या भ्रष्टाचाराचे कोट्यवधींचे आकडे बाहेर आले.
अशी आहे रचना (सध्या प्रशासक असल्याने कारभार त्यांच्याकडे आहे.)
- कार्याध्यक्ष : राजाराम मगदूम (१९ फेब्रुवारी २०२३ ला निधन)
- मानद अध्यक्ष : धैर्यशील भोसले
- सचिव : रावसाहेब कोणकेरी
- खजिनदार : आप्पासाहेब रावसाहेब देसाई (रा. वनूर, जि. बेळगाव)
- पदसिद्ध विश्वस्त : आदमापूरचे सरपंच व पोलिस पाटील
- विश्वस्त : गोविंद दत्तू पाटील (कागल), कुंडलिक हनम्माप्पा होसमनी, तमान्ना तमान्ना मासरेडी, रामाण्णा भिमाप्पा मरेगुद्री, शिवनगोंडा तमनगोंडा पाटील (पाचही मुधोळ, बागलकोट), शिवाजी लक्ष्मण मोरे (औरनाळ. ता. गडहिंग्लज), लक्ष्मण बाबुराव होडगे (रा. जरळी, ता. गडहिंग्लज), भिकाजी बापू शिनगारे (रा. रुकडी, ता. हातकणंगले), रामचंद्र बाबू जोग (रा. माणगाव, ता. हातकणंगले), आप्पासाहेब बापू पुजारी (रा. अप्पाचीवाडी, ता. चिकोडी), भिकाजी जिवबा चव्हाण (रा. गलगले, ता. कागल), दुंडाप्पा दाणाप्पा मूर्ती (रा. भडगाव, ता. गडहिंग्लज), सिद्दाप्पा दुर्गाप्पा सुरानवर (रा. सौंदत्ती, जिल्हा बेळगाव) यातील सहा विश्वस्तांचे निधन झाले आहे.
१२ वर्षे कोर्टकचेऱ्या
कार्याध्यक्षांना आर्थिक व्यवहार व सहीचे अधिकार असल्याने सुरूवातीपासूनच त्यांच्यात व मानद अध्यक्षांमध्ये वाद होते. १२ वर्षांच्या कोर्टकचेरीनंतर समेट केला. कार्याध्यक्षांच्या निधनानंतर मानद अध्यक्षांनी ट्रस्टवर दावा केला. रिक्त जागांवर नियुक्तीचा प्रयत्न झाला. मात्र, अन्य १० विश्वस्तांचा विरोध होता. त्यातून गावात व कोल्हापुरातही हाणामारी झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार झाली आहे.