खासगी रुग्णालयांना म्युकरवरील उपचारांची सक्ती करा:शिवसेनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 05:18 PM2021-06-07T17:18:01+5:302021-06-07T17:20:13+5:30
: म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे औषधोपचार व पैशांअभावी हाल होत आहेत. तरी जी खासगी रुग्णालये शासनाच्या योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांचे प्रमुख व ईएनटी सर्जन यांची बैठक घेऊन त्यांना रुग्णांवरील उपचाराची सक्ती करावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. याबाबत प्रशासनानेही पावले उचलत मंगळवारी दुपारी ४ वाजता खासगी रुग्णालयांची बैठक बोलावली आहे.
कोल्हापूर : म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे औषधोपचार व पैशांअभावी हाल होत आहेत. तरी जी खासगी रुग्णालये शासनाच्या योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांचे प्रमुख व ईएनटी सर्जन यांची बैठक घेऊन त्यांना रुग्णांवरील उपचाराची सक्ती करावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. याबाबत प्रशासनानेही पावले उचलत मंगळवारी दुपारी ४ वाजता खासगी रुग्णालयांची बैठक बोलावली आहे.
या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले. जिल्ह्यात सध्या म्युकरमायकोसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून त्यांच्यावर सध्या केवळ सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. यामुळे सीपीआरवर मोठा ताण येत आहे. शहर-जिल्ह्यातील पाच दवाखाने शासनाने उपचारासाठी जाहीर केले आहे. मात्र, आजवर सीपीआरमध्ये २५ शस्त्रक्रिया तर तीन खासगी दवाखान्यात झाल्या आहेत. ज्या रुग्णालयांना शासकीय योजना लागू आहेत त्यांनीही हात वर केले आहेत.
या रुग्णांचे उपचाराच्या व पैशाच्या पातळीवरदेखील हाल होत आहेत. त्यामुळे जे दवाखाने शासकीय योजनांचा लाभ घेतात त्यांचे प्रमुख व ईएनटी सर्जन यांची तातडीने बैठक घेण्यात यावी व त्यांना म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी द्यावी. अन्यथा कायद्याच्या चौकटीत धडा शिकवावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकाऱ्यांनीही तातडीने रुग्णालयांची बैठक घेऊन त्यांना सूचना देण्याचे आश्वासन दिले. मंगळवारी दुपारी ४ वाजता याबाबत बैठक होणार आहे. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, माजी आमदार सुरेश साळोखे, शिवाजीराव जाधव, मंजित माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.