दहा टक्के साखर निर्यातीची सक्ती करा-- राजू शेट्टी : उमळवाड येथे शेतकरी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:16 AM2018-06-10T00:16:00+5:302018-06-10T00:16:00+5:30
राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी अखेरीची बिले अद्याप दिली नाहीत. त्यामुळे २७ व २८ जूनला साखर आयुक्तांना घेराव घालण्यासाठी पुण्याला जायचे आहे.
उदगाव : राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी अखेरीची बिले अद्याप दिली नाहीत. त्यामुळे २७ व २८ जूनला साखर आयुक्तांना घेराव घालण्यासाठी पुण्याला जायचे आहे. उर्वरित बिले काढल्याशिवाय संघटना गप्प बसणार नाही. साखरेला भाव मिळण्यासाठी देशातून ३० लाख टन साखर निर्यात केल्यास भाव आपोआप वाढतील. प्रत्येक साखर कारखान्याला १० टक्के साखर निर्यात करण्याची सक्ती केल्यास शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.
उमळवाड (ता. शिरोळ) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व ग्रामविकास आघाडी यांच्यावतीने उद्घाटन सोहळा व शेतकरी मेळावा आयोजित केला होता. यावेळी खासदार शेट्टी बोलत होते. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे यांच्या फंडातून उमळवाडच्या विकासासाठी सुमारे ५७ लाख रुपयांच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शेट्टी म्हणाले, राज्यात २५०० कोटी, तर देशात २० हजार कोटी रुपये साखर कारखानदारांनी थकविले आहे. हे पैसे ३० जूनच्या आत अगोदर द्यावेत अन्यथा आर्थिक कोंडी होईल.उपसरपंच सरिता भवरे यांनी स्वागत, तर सागर चिपरगे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सावकार मादनाईक, शेखर पाटील, राजगोंडा पाटील, सुरेश कांबळे, सचिन शिंदे, नगरसेवक नितीन बागे उपस्थित होते.
मृतदेहावरील कापडालाही जीएसटी
भाजप सरकारने शेतकºयांच्या वस्तूबरोबरच मृतदेहावरील कापडावरही जीएसटी लावला आहे. त्यामुळे या सरकारला आता खुर्चीवरून खाली खेचल्याशिवाय पर्याय नाही असे शेट्टी म्हणाले.
भाजपमुळे दर पडले
भाजप सरकार एकीकडे सोयाबीन, हरभरा, तूर, उडीद, मूग खरेदी करतो असे सांगतात. मग ते खरेदी केले जात नाही. भारतात अतिरिक्त साखर असताना पाकिस्तान देशातून साखर खरेदी केली जाते. भाजीपाल्याला काडीमोड भाव या भाजप सरकारमुळेच मिळत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.