पैसे देणाऱ्याला नोकरीची मजबुरी
By admin | Published: November 2, 2014 12:42 AM2014-11-02T00:42:40+5:302014-11-02T00:47:18+5:30
‘गुणवत्ता’ याच निकषावर कर्मचारी भरतीची गरज
भीमगोंडा देसाई ल्ल कोल्हापूर
शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र डोनेशनने पोखरले आहे. भांडवलदारच संस्थाचालक आणि शिक्षक होणार, अशी सध्याची व्यवस्था. डोनेशनचा सर्व व्यवहार चार भिंतींंमधील असतो. पैसे देणाऱ्याला नोकरीची मजबुरी असते. त्यामुळे दहा रुपये देताना विचार करणाराही लाखो रुपये देताना कोणतीही पोहोच, पुरावा घेत नाही. डोनेशन घेता आणि देता येऊ नये; केवळ गुणवत्तेवरच शिक्षकांची नियुक्ती झाली पाहिजे, अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी समाजातील शिक्षणतज्ज्ञ, राजकारणातील प्रामाणिक लोकांनी व्यापक प्रमाणात पुढे येण्याची गरज ठळक झाली आहे.
जिल्ह्यासह राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये डोनेशन संस्कृती फोफावली आहे. कोल्हापूर जिल्ह्याला राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास आहे. महाराजांनी सर्वसामान्यांना व बहुजनांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी मोठे योगदान दिले. त्यामुळे सर्वसामान्य, गरीब, गुणवंत शिक्षकांना शिक्षक होण्याची दार बंद होऊ नयेत म्हणून ठोस काहीतरी करण्याची जबाबदारी या जिल्ह्यावर अधिक आहे. विविध चळवळींच्या माध्यमातून अनेक मग्रुर अधिकारी व राजकारण्यांना वठणीवर आणण्यात यश आले आहे. डोनेशनची प्रवृत्तीही ठेचून काढण्याची सुरुवात जिल्ह्यातून सुरू व्हावी, अशी अनेकांची अपेक्षा आहे. शिक्षणाची गुणवत्ता ढासळण्याला डोनेशन संस्कृती हे मुख्य कारण आहे. दर्जा राखण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांचेही प्रचलित राजकीय व्यवस्थेमुळे ‘हात’ बांधले आहेत. यामुळे आता परिवर्तनासाठी सकारात्मक पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. डोनेशनमुळेच गुणवत्ता नसलेल्या शिक्षकांची नेमणूक होत आहे, दर्जा घसरत आहे, हे शासकीय यंत्रणेच्या उशिरा का होईना लक्षात आले आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेत पास झालेल्यांना शिक्षक म्हणून नियुक्त करावे, असे आशादायक बदल होत आहेत. बदलाची गती संथ आहे. बदलाला वेग येऊन शिक्षकभरतीचे संपूर्ण अधिकार संस्थाचालकांकडून काढून घेऊन गुणवत्ता या एकाच निकषावर नियुक्ती झाल्यास डोनेशनच्या प्रवृत्तीला आळा बसणार आहे. या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, अनेक संस्थाचालकांची राजकीय नेत्यांशी सलगी असते. निवडणुकीत हवे तितके फंडिंग केलेले असते. त्यामुळे निवडून आल्यानंतर त्या शिक्षणसंस्थाचालकांना पोषक होईल असे धोरण ठरविण्यात संंबंधित लोकप्रतिनिधींचा कल असतो. यामुळे शिक्षक निवडीच्या निकषांच्या बदलात व्यत्यय येत आहे, असे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी खासगीत बोलताना सांगतात.
चव्हाट्यावर आणल्यास फरक शक्य
डोनेशन प्रवृत्तीची झळ बसलेल्या गरीब, सर्वसामान्य वर्गातील हुशार, गुणवंत उमेदवारांनी रडत बसण्यापेक्षा संघटितपणे संबंधित शिक्षण संस्थांच्या विरोधात विविध माध्यमांतून लढण्याची अचूक वेळ आली आहे. लोकशाही मार्गाचा अवलंब करीत प्रसंगी डोनेशनबहाद्दरांच्या विरोधात रस्त्यावर उतरून प्रवृत्ती चव्हाट्यावर आणल्यास डोनेशन घेऊन शिक्षक भरती झाली आहे, हे पालकांना जाहीरपणे सांगितल्याचा त्वरित ‘रिझल्ट’ अन्यायग्रस्त अशा आंदोलनकर्त्यांना मिळणार आहे. परिणामी पालकही पाल्याला डोनेशनबहाद्दरांच्या शाळेत दाखल करताना गांभीर्याने विचार करतील. (समाप्त)