हुपरी येथे महिला कर्मचाऱ्यांमार्फत वीज बिलाची सक्तीने वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:22 AM2021-03-15T04:22:54+5:302021-03-15T04:22:54+5:30
दरम्यान शहरांत सक्तीने सुरू असलेल्या वीज बिल वसुलीच्या विरोधात कोल्हापूर अन्यायी वीज बिल विरोधी समितीचे श्रीनिवास साळोखे, बाबा पार्टे, ...
दरम्यान शहरांत सक्तीने सुरू असलेल्या वीज बिल वसुलीच्या विरोधात कोल्हापूर अन्यायी वीज बिल विरोधी समितीचे श्रीनिवास साळोखे, बाबा पार्टे, चांदी कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर नाईक, उपाध्यक्ष दिनकर ससे आदींची चांदी कारखानदार असोसिएशनच्या कार्यालयात बैठक झाली. यामध्ये महावितरणच्या कारभाराबाबत महावितरणचे सहायक अभियंता एस.डी. मंगसुळे यांना बोलवून घेऊन धारेवर धरत, वीज बिलाच्या सक्तीच्या वसुलीसाठी महिला कर्मचाऱ्यांचा वापर करणे चुकीचे असल्याचे सांगितले. यावेळी सहायक अभियंता मंगसुळे यांनी सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस न धरता बिलांची सक्तीने वसुली करणार नसल्याचे सांगितले.
बैठकीत श्रीनिवास साळोखे म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनने सर्वसामान्य जनता अक्षरशः अर्धमेली झाली आहे. चांदी उद्योगासाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या या शहरातील चांदी उद्योग पूर्णपणे कोलमडून गेला आहे. कामगारांच्या हाताला काम नाही अशी परिस्थिती असताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज बिल सक्तीने वसुलीसाठी वीज कनेक्शन खांबावरून तोडून टाकणे चुकीचे आहे. अन्यायी वीज बिलाविरोधात शासन दरबारी पाठपुरावा सुरू असल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य ग्राहकांना सक्ती करू नये. अन्यथा त्यांचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा दिला. जिल्ह्यातील अन्यायी वीज बिल वसुलीविरोधात मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे साळोखे यांनी यावेळी सांगितले. यावेळी संचालक बाळासाहेब जाधव, भाऊसाहेब गायकवाड, रामदास म्हेतर, किरण पोतदार आदी उपस्थित होते.
--------::--------