नेत्यांच्या वारसदारांकडून मोर्चेबांधणी
By admin | Published: June 18, 2016 12:12 AM2016-06-18T00:12:30+5:302016-06-18T00:15:15+5:30
जिल्हा परिषद अध्यक्षपद : जिल्ह्यातील राजकारण रंगतदार वळण घेणार; लढण्याचे अनेक पर्याय
आयुब मुल्ला --खोची --आगामी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले झाल्याने मातब्बर नेत्यांच्या वारसदारांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. सध्या नेत्यांमध्येच अंतर्गत राजकीय गटबाजी असल्याने दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पदरात पाडून घेण्याची तयारी सुरु केली आहे. फक्त लढायचं कसं, पक्षातून, पक्षांतर करून की आघाडी करून? या मुद्यावर ते आता अडकले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण रंगतदार वळण घेईल, असे चित्र दिसत आहे.
सध्या जिल्हा परिषदेत काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची सत्ता आहे. त्यांच्यामध्ये सध्या भयानक गटबाजी वाढली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या गटाकडे अध्यक्षपद, तर उपाध्यक्षपद आमदार सतेज पाटील यांच्या गटाकडे आहे. मात्र, गोकुळ दूध संघ, विधान परिषद निवडणुकीपासून काँग्रेसच्या या दोन नेत्यांच्या गटांमध्ये चांगलेच वितुष्ट आले आहे. यांच्याबरोबर सत्तेत सहभागी असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बांधकाम सभापती व त्याच संघटनेच्या जिल्हा परिषद सदस्या (दोघेही शिरोळ तालुक्यातील) यांच्यात निधी वाटपावरून चांगलाच संघर्ष सुरू आहे. आरोपांमुळे त्यांच्यातील गटबाजी उघड झाली आहे. जिल्हा परिषदेतील सत्ताधारी गटांची अशी अवस्था आहे, तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकसंघपणाचा अभाव आहे. बहुतेक सदस्य स्वत:लाच नेते समजत आहेत. शिवसेना, भाजप आणि जनसुराज्य यांची सदस्यसंख्या अल्प आहे. त्यामुळे विरोधक म्हणून म्हणावे तितके सभागृह प्रश्नांच्या भडिमाराने दणाणतच नाही. हा सर्व संदर्भ लिहिण्यामागे आगामी राजकारण कसे असेल, हे दिसून येते. पूर्वीसारखे अमुक पक्षाचेच तिकीट घेऊन लढले पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची मानसिकता असेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. त्यामुळे नुसते अध्यक्षपद खुले झाले म्हणजे नेत्यांच्या वारसदारांचा तेथे नंबर लागेल, असा अंदाज बांधता येणार नाही. कारण दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते प्रचंड सावध झाले आहेत. त्यांच्यापुढे चांगले पर्याय आहेत. त्यासाठी ऐनवेळी कोणतीही भूमिका ते घेऊ शकतात. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजप, संघटना, जनसुराज्य या पक्षांच्या नेत्यांनी आपल्याच कुटुंबातील वारसदाराला प्रोजेक्ट करावे, अशी सद्य:स्थिती नाही. त्यांना कार्यकर्त्यांचाही विचार करावाच लागेल. कोणत्याही पक्ष, संघटनेत ऐक्य नाही. गटांतर्गत राजकारणाने त्यांना पोखरले आहे. अशावेळी स्वतंत्र आघाडी स्थापन करण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती संयुक्तपणे लढविण्याचा विचार आघाड्यांमध्ये सुरू असल्याचे समजते. आघाडी बांधण्यासाठी पहिले पाऊल हातकणंगलेतून उचलले आहे. सर्व पक्षांतील नाराज, मातब्बर यांच्यावर कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
आघाड्यांचे पेव फुटणार
तालुकानिहाय वेगवेगळ्या नावांच्या आघाड्या उदयास येतील. ज्या-त्या तालुक्यांत परिस्थितीनुरूप त्या नाव धारण करतील. यामुळे आघाड्यांचे पेव मात्र निश्चित फुटणार, हे स्पष्ट आहे. सत्तेवर येण्यासाठी आघाड्यांचीच गरज भासेल, असे सध्याचे चित्र दिसत आहे. नाराज झालेले पक्षांतर करतील, बंडखोरी करतील, आघाडी निर्माण करतील पण लढतील. कोण कोणासाठी थांबणार नाही, इतके पर्याय कार्यकर्त्यांसमोर आहेत.