उच्च शिक्षणात ‘सावित्रीच्या लेकी’ आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:24 AM2021-03-05T04:24:35+5:302021-03-05T04:24:35+5:30
कोल्हापूर : जन्मदरात मुलांशी बरोबरी करता आली नाही, म्हणून काय झाले, शिक्षण घेण्याच्या मिळालेल्या संधीचे सोने करत पदवीधर ...
कोल्हापूर : जन्मदरात मुलांशी बरोबरी करता आली नाही, म्हणून काय झाले, शिक्षण घेण्याच्या मिळालेल्या संधीचे सोने करत पदवीधर होण्यामध्ये मुलांपेक्षा आपणच आघाडीवर असल्याचे शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ‘सावित्रीच्या लेकींनी’ दाखवून दिले आहे. गेल्या पाच वर्षांत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील १ लाख ३७ हजार मुली पदवीधर झाल्या आहेत. पदवीधर मुलांची संख्या १ लाख २३ हजार ६९० इतकी आहे.
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सांगली जिल्ह्यात जन्मदरात सध्या एक हजार मुलांमागे १०२७ आहे. पण, कोल्हापूरमध्ये एक हजार मुलांमागे ९२७ मुली, साताऱ्यामध्ये ९४० मुली असे प्रमाण आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जन्मदरात मुलींना अद्याप मुलांशी बरोबरी साधता आलेली नाही. मात्र, अभ्यासातील सातत्य, जिद्द आणि कष्टाच्या जोरावर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील या तिन्ही जिल्ह्यांमधील मुली शिक्षणामध्ये आघाडीवर आहेत. दहावी, बारावी, पदवीधर शिक्षण घेण्यासह त्यामध्ये उत्तीर्णतेचे त्यांचे प्रमाण वर्षागणिक वाढत आहे. विज्ञान-तंत्रज्ञान, पारंपरिक अभ्यासक्रमापासून ते पदविका अभ्यासक्रमांपर्यंत आणि पदवीधर होण्यात मुलांच्या तुलनेत मुलींचा टक्का गेल्या पाच वर्षांमध्ये वाढला आहे. विज्ञान, वाणिज्य, संगणकशास्त्र, फार्मसी, शिक्षणशास्त्र, मानव्यविद्या आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमामध्ये पदवीधर होण्यात मुली आघाडीवर आहेत. तंत्रज्ञान विद्याशाखेत त्या मुलांपेक्षा थोड्या मागे आहेत. एकूण स्थिती पाहता बदलत्या काळानुसार पाऊले टाकत त्या रोजगाराभिमुख शिक्षण घेण्याकडे त्यांचा कल वाढला आहे. दूरशिक्षण केंद्राच्या माध्यमात एकूण १४२१२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये ७६५८ इतक्या विद्यार्थिनी आहेत. स्पर्धा परीक्षा देण्यात आणि त्यामध्ये यशस्वी होण्यात त्यांचा टक्का वाढता आहे. शिक्षणातील वाढता टक्का महिला सक्षमीकरणाला बळ देणारा आहे.
चौकट
शिक्षणाला बळ
उच्च शिक्षणाबाबतची वाढलेली जागृती, शैक्षणिक शुल्कातील सवलत, आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थिनींसाठी बस पास योजना, आदींमुळे उच्च शिक्षणातील मुलींच्या शिक्षणाला बळ मिळण्यासह त्यांचा टक्का वाढत आहे.