कोल्हापूर: सव्वादोन लाखांची विदेशी मद्यसाठा जप्त, एकास अटक; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई
By तानाजी पोवार | Published: August 29, 2022 05:27 PM2022-08-29T17:27:29+5:302022-08-29T17:28:02+5:30
सव्वादोन लाखांच्या विदेशी मद्यसाठा व चारचाकी वाहन असा सुमारे ५ लाख २६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर : अवैध मद्याची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर भरारी पथकाने शेर्ले (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथे छापा टाकून सव्वादोन लाखांच्या विदेशी मद्यसाठा व चारचाकी वाहन असा सुमारे ५ लाख २६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई काल, रविवारी रात्री उशिरा केली. याप्रकरणी पथकाने मोटारचालक श्रीकृष्ण सुभाष कदम (वय ३२ रा. चव्हाटेश्वर मंदिर हुमरमळा, अणाव, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) यास अटक केली.
भरारी पथकाने दिलेली माहिती अशी की, शेर्ले गावच्या हद्दीतून विदेशी मद्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये शेर्ले येथे छापा टाकला. कागदी पुट्ट्याच्या बॉक्समध्ये गोवा राज्यात विक्रीकरिता असलेले भारतीय बनावटीचे विविध कंपनीचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. मद्याच्या सीलबंद ४२० प्लास्टिकच्या बाटल्या, बिअरचे १२० टिन असे एकूण २ लाख २६ हजार २०० रुपये किमतीचा ४० बॉक्स विदेशी मद्यसाठा व मोटार कार असा सुमारे ५ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर, कारचालकास अटक केली.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त बी. एच. तडवी यांच्या आदेशाने दुय्यम निरीक्षक एस. जे. ढेरे, एस. एस. गोंदकर व कॉन्स्टेबल सुशांत बनसोडो, विलास पवार, अमोल यादव, दीपक कापसे यांनी केली.