परदेशी विद्यार्थ्यांनी साजरी केली कोल्हापुरात दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 11:52 AM2019-11-01T11:52:14+5:302019-11-01T11:55:03+5:30
कोल्हापूर : दिवाळी सणाच्या काळात समाजामध्ये आनंदाचे वातावरण असते. सर्वच स्तरांवर आपापल्या परीने हा सण साजरा केला जातो. या ...
कोल्हापूर : दिवाळी सणाच्या काळात समाजामध्ये आनंदाचे वातावरण असते. सर्वच स्तरांवर आपापल्या परीने हा सण साजरा केला जातो. या काळात भारतात राहणाऱ्या परदेशी व्यक्ती या आनंदापासून वेगळ्या कशा राहतील? कोल्हापुरात शिक्षणाच्या निमित्ताने राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही दिवाळी सण साजरा करण्याचा मोह आवरला नाही.
कोल्हापुरात शिक्षणासाठी परदेशातील अनेक विद्यार्थी वास्तव्य करून आहेत. येथील डॉ. डी. डी. शिंदे सरकार कॉलेज, शहाजी कॉलेज तसेच भारती विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये आणि शिवाजी विद्यापीठातील विविध विभागांत तसेच सायबर महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी परदेशातील, विशेष करून दक्षिण आफ्रिकेमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कोल्हापुरात वास्तव्यास आहेत.
सायबर कॉलेजचे डॉ. दीपक भोसले आणि अॅड. अश्विनी बाटे यांच्या प्रयत्नातून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या परदेशी विद्यार्थ्यांसोबत दिवाळी सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. या परदेशातील संपर्कात असणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्रित बोलावून त्यांच्यासोबत प्रत्येक वर्षी दिवाळी सण साजरा करण्यासाठी डॉ. भोसले पुढाकार घेतात.
यावर्षीदेखील केनियातील मोझेस, लुसी, ओकियो, सेमी, झांबिया येथील सेमेसो यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली. या विद्यार्थ्यांना दिवाळी सणाची पार्श्वभूमी, परंपरेप्रमाणे केले गेलेले फराळाचे विविध पदार्थ, भेटवस्तू देण्यात आल्या.
यासोबतच आफ्रिकेमधील संस्कृतीची तोंडओळख करण्यात आली. याप्रसंगी परदेशी विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य सादर केले. एकंदरीतच कोल्हापूर आणि भारतीय संस्कृतीविषयी आदरभाव व्यक्त केला. या कार्यक्रमाप्रसंगी सुनट डान्स अकॅडमीचे संचालक गणेश जंगम, उद्योजक अविनाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड, रत्नप्रभा भोसले, राजश्री कारंडे, इत्यादी उपस्थित होते.
कोल्हापुरात सायबर कॉलेजमध्ये आफ्रिकन विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात डॉ. दीपक भोसले, अॅड. अश्विनी बाटे यांच्यासोबत आफ्रिकन विद्यार्थी सहभागी झाले होते.