‘फॉरेन्सिक लॅब’ एप्रिलपासून
By admin | Published: March 6, 2016 01:02 AM2016-03-06T01:02:02+5:302016-03-06T01:02:02+5:30
चार जिल्ह्यांची सोय : पोलीस महासंचालक बोरवणकर यांच्याकडून जागांची पाहणी
कोल्हापूर : व्हिसेराच्या चाचणीचा रिपोर्ट तत्काळ मिळण्यासाठी नांदेडपाठोपाठ आता कोल्हापुरातही दि. १ एप्रिलपासून ‘फॉरेन्सिक लॅब’ (प्रादेशिक न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा) सुरू होत आहे. कावळा नाका येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (बांधकाम) विभागाची इमारत काही वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतली आहे.
या लॅबमध्ये कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील ‘व्हिसेरा’ची चाचणी होणार आहे, अशी माहिती विधि आणि तांत्रिक विभागाच्या पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
मृताच्या शवविच्छेदनावेळी शरीरातील किडनी, जठर, रक्त, मेंदू, आदी काढलेले भाग पुणे येथील औंध प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. त्यांचे रिपोर्ट वेळेवर मिळत नसल्याने तपासकामास विलंब लागतो, अशा तक्रारी कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतून गृहविभागाकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत गृहविभागाने नांदेडपाठोपाठ कोल्हापूरच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. नांदेडमध्ये १० फेब्रुवारी २०१६ रोजी फॉरेन्सिक लॅब सुरू करण्यात आली. दि. १ एप्रिलपासून कोल्हापुरात लॅब सुरू करण्याचे शासनाचे निर्देश होते. त्यानुसार राज्याच्या विधि आणि तांत्रिक विभागाच्या प्रशासनाने कावळा नाका येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (बांधकाम) विभागाची इमारत भाडेतत्त्वावर घेतली. ‘फॉरेन्सिक लॅब’ला कायमस्वरूपी इमारत मिळावी, यासाठी कसबा बावडा येथील गोळीबार मैदान व कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावरील केर्ली येथील जागेची निश्चिती करण्यात आली होती. या जागेची पाहणी करण्यासाठी राज्याच्या विधि आणि तांत्रिक विभागाच्या पोलीस महासंचालक बोरवणकर शनिवारी सकाळी कोल्हापुरात आल्या. त्यांनी पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची भेट घेतली. त्यानंतर कावळा नाका येथील इमारतीची पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर गोळीबार मैदान व केर्ली येथील जागांचीही त्यांनी पाहणी केली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून फॉरेन्सिक लॅबला पाठविलेल्या ‘व्हिसेरा’चा तपासणीचा अहवाल लवकर प्राप्त होत नसे; त्यामुळे बहुतांश गुन्ह्यांचे तपास लांबणीवर पडत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यांची दखल घेत कोल्हापूरला फॉरेन्सिक लॅब सुरू करण्यासाठी मंजुरी दिली. त्यासाठी तात्पुरती भाडेतत्त्वावर इमारत पाहून दि. १ एप्रिलपासून लॅब सुरू करण्याचे निर्देश होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पुढाकार घेऊन लॅबसाठी जागा दिली. शासनाने इमारत दुरुस्तीसाठी व फर्निचरसाठी २४ लाखांचा निधी दिला आहे. उर्वरित ११ लाख रुपयेही मिळणार आहेत. ‘फॉरेन्सिक लॅब’चे युद्धपातळीवर सुरू असलेले काम पाहण्यासाठी आपण कोल्हापुरात आल्याचे त्या म्हणाल्या.
गोळीबार मैदानाची निवड?
४‘फॉरेन्सिक लॅब’करिता कायमस्वरूपी इमारत बांधण्यासाठी गोळीबार मैदान व केर्ली येथील जागेची निवड केली होती. या दोन्हीही जागांची पाहणी पोलीस महासंचालक बोरवणकर यांनी केली.
४यावेळी उपसंचालक राणा कोकटे यांनी चार जिल्ह्यांसाठी गोळीबार मैदान हीच जागा सोयीस्कर आहे. त्या जागेची आपण शिफारस करावी, अशी विनंती केली. त्याला बोरवणकर यांनी हिरवा कंदील दाखविल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चार विभाग सुरू
फॉरेन्सिक लॅबमध्ये जीवशास्त्र, विषशास्त्र, दारूबंदी, सामान्य विश्लेषण, आदी चार विभाग सुरू करण्यात येणार आहेत. या विभागात यंत्रसामग्री जोडण्याचे काम सुरू आहे. या संपूर्ण विभागाचे कामकाज उपसंचालक राणा कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे. त्यासाठी ५४ तज्ज्ञ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.