फॉरेन्सिक अहवाल आठवड्यात द्यावा
By admin | Published: January 8, 2016 01:28 AM2016-01-08T01:28:16+5:302016-01-08T01:29:39+5:30
हायकोर्टाचे आदेश : पानसरे-दाभोलकर खटला; पुढील सुनावणी १ फेब्रुवारीस
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे नेते डॉ. नरेंद्र दाभोलकर व कर्नाटकातील पुरोगामी लेखक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या करण्यासाठी वापरलेले शस्त्र एकच असल्याचा अहवाल कर्नाटक पोलिसांनी दिला आहे; परंतु त्या अहवालाची प्रत आम्हाला अद्याप मिळाली नसल्याची हतबलता ‘सीबीआय’च्यावतीने गुरुवारी उच्च न्यायालयात व्यक्त करण्यात आली. न्यायालयाने या तपासाबाबत सीबीआय व राज्य शासनाने नियुक्त केलेल्या एसआयटी पथकाचीही चांगलीच कानउघाडणी केली. मिळवावा, असे आदेश न्यायाधीश रणजित मोरे व व्ही. एल.अचलिया यांच्या खंडपीठाने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, सीबीआयचे मुख्य संचालक यांना दिला. या आदेशाची प्रत कर्नाटकच्या गृहसचिवांना पाठविण्याच्या सूचना त्यांनी न्यायालयाच्या अधीक्षकांना दिल्या. हा अहवाल सात दिवसांत मिळायला हवा, असे आदेशच न्यायालयाने दिले. या प्रकरणात ‘एनआयए’लाही पक्षकार करण्यात यावी, अशी मागणी न्यायालयात झाली; परंतु न्यायालयाने तसा आदेश दिला नाही.
या प्रकरणाची पुढील सुनावणी आता दि. १ फेब्रुवारीस होणार आहे.
गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्यांचा तपास लवकर लागावा, यासाठी करण्यात आलेल्या याचिकेची एकत्रित सुनावणी गुरुवारी या खंडपीठापुढे झाली. दोन्ही याचिकांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभय नेवगी यांनी बाजू मांडली. यावेळी डॉ. मुक्ता दाभोलकर, कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या आदी उपस्थित होते.
नेवगी न्यायालयात बाजू मांडताना म्हणाले,‘या तिघांच्याही खुनासाठी एकच पिस्तूल वापरले असल्याचे कर्नाटक पोलिसांनी जाहीर केले आहे तशा वृत्तपत्रांत बातम्या आल्या आहेत. मग महाराष्ट्र पोलीस पुढे तपास का करत नाहीत..? ’
गुरुवारी प्रथमच सीबीआयच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग व राज्य सरकारच्यावतीने वरिष्ठ सरकारी वकील संदीप शिंदे न्यायालयात उपस्थित होते. अनिल सिंग यांनी कर्नाटक पोलीस फॉरेन्सिक अहवाल देत नसल्याचे निदर्शनास आणून दिले व हा अहवाल त्यांनी द्यावा यासाठी न्यायालयाने आदेश द्यावेत, अशी विनंती केली. त्यास अॅड. नेवगी यांनी तीव्र हरकत घेतली. सीबीआय ही देशाची सर्वोच्च गुन्हे शोधसंस्था आहे. अशा संस्थेला फॉरेन्सिक अहवाल मिळविण्यासाठी न्यायालयाची मदत घ्यावी लागत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. सीबीआयच्या या मागणीवर न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली. मुंबई उच्च न्यायालय कर्नाटक पोलिसांना थेट आदेश देऊ शकत नसल्याने खंडपीठाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना हा अहवाल कर्नाटक पोलिसांकडून मिळविण्याचे आदेश दिले.
कर्नाटक पोलिसांकडून फॉरेन्सिक अहवाल
आणखी दोन संशयितांचा शोध
पानसरे हत्याप्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या शाळकरी मुलाने या हत्येत आणखी दोन मारेकरी होते व ते मोटारसायकलवरून आल्याचे सांगितले आहे; परंतु पोलिसांनी याचा तपास आजपर्यंत का केला नाही, अशी विचारणा अॅड. नेवगी यांनी न्यायालयास केली. न्यायालयाने या संदर्भातील सत्यता तपासून पाहण्याचे आदेश दिले.
‘सनातन’च्या
पत्राचीही दखल
सनातन संस्थेने पानसरे खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या जीविताबद्दल भीती व्यक्त करणारे पत्र राजारामपुरी पोलिसांना पाठविले आहे. न्यायालयाने त्याचीही दखल घेतली परंतु त्याचा अर्थ आपण कसा लावतो तसा निघतो, त्यामुळे त्यावर कोणतेच भाष्य न्यायालयाने केले नाही.
रूद्र पाटीलचे काय..?
दाभोलकर व पानसरे खूनप्रकरणात रूद्र पाटील याचा सहभाग असावा असा पोलिसांचा संशय आहे परंतु त्याला पकडण्यासाठी पोलिसांकडून सध्या कोणते प्रयत्न सुरू आहेत, अशीही विचारणा न्यायालयाने केली.
पानसरे हत्येप्रकरणाचा कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या हे तपास करत आहेत. ते नवखे असल्याचे मत न्यायालयाने त्यांच्याकडे पाहत नोंदविले व अशा महत्त्वाच्या खटल्याचा तपास अनुभवी अधिकाऱ्यांना द्यावा, असे सूचित केले.