सुलगाव-सोहाळे दरम्यानच्या १० एकर क्षेत्राला वनवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:26 AM2021-03-10T04:26:39+5:302021-03-10T04:26:39+5:30
आजरा : आजरा तालुक्यातील सुलगाव नर्सरीसह खाजगी क्षेत्रातील १० एकर क्षेत्राला लागलेल्या वनव्यात जैवविविधतेसह आठ ते दहा ...
आजरा :
आजरा तालुक्यातील सुलगाव नर्सरीसह खाजगी क्षेत्रातील १० एकर क्षेत्राला लागलेल्या वनव्यात जैवविविधतेसह आठ ते दहा शेतकऱ्यांची काजूची झाडे व गवताच्या गंजी जळाल्या. आगीत सुलगाव नर्सरीतील विविध जातींचे मातृवृक्ष, गवताच्या गंजीसह १२ लाखांवर नुकसान झाले आहे.
आज दुपारच्या सत्रात लागलेली आग काही क्षणातच सुलगाव नर्सरीपाठोपाठ खाजगी क्षेत्रात घुसली. आग लागल्याचे समजताच सुरेश देसाई, मारुती कळेकर यासह शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही आग आटोक्यात आली नाही. सोहाळे येथील मारुती कळेकर व धोंडिबा कळेकर यांच्या रांगी नावाच्या शेतातील २५ ते ३० काजूची झाडे जळाली. तर मारुती कळेकर यांची गवताची गंजी जळून खाक झाली. तसेच सुलगाव येथील सुरेश देसाई, बाळासाहेब देसाई, शिवाजी देसाई, संभाजी देसाई, जगदीश देसाई यांचीही काजूची अंदाजे ८० ते ९० झाडे जळाली. खाजगी क्षेत्राबरोबरच वन विभागाच्या सुलगाव नर्सरीतीलही काजूच्या झाडांसह मातृवृक्ष संपदेला आगीची झळ बसली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आग विझविण्याच्या फायर ब्लोअर मशीनच्या साहाय्याने रात्री उशिरा आग विझविण्यात यश आले.
फोटोकॅप्शन - सुलगाव येथील लागलेल्या आगीत मारुती कळेकर यांच्या जळालेल्या गवताचया गंजी, तर दुसऱ्या छायाचित्रात नर्सरीतील आग फायर ब्लोअर मशीनच्या साहाय्याने विझविताना वन विभागाचे कर्मचारी.