सत्यानाश ! कोल्हापूरातील अधिकाऱ्याला नोकरीच्या शेवटच्या दिवशी लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 09:59 PM2018-05-31T21:59:06+5:302018-05-31T21:59:06+5:30
कोल्हापुरातील उपवनविभागात या कारवाईने एकच खळबळ उडाली.
कोल्हापूरः दीड हजारांची लाच स्वीकारणाऱ्या उप वनसंरक्षक कार्यालयातील लेखापाल सदाशिव सातपुतेला गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सदाशिव सातपुते याची ही अटक शहरात चांगलाच चर्चेचा विषय ठरली. कारण, आज ज्ञानदेव सातपुते याचा कामावरील आज शेवटचा दिवस होता. दोन तासानंतर ते निवृत्त होणार होता. मात्र, पैशाचा मोह नडला आणि सातपुतेच्या कारकीर्दीचा शेवट कटू झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर सातपुते याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.
शाहूवाडी तालुक्यातील एका व्यक्तीने लेखापाल सदाशिव याने आपल्याकडे लाच मागितल्याची तक्रार केली होती. तक्रारदाराचा जमीन खरेदी–विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे एका महिलेने त्यांची जमीन विक्री करण्यासाठी विचारणा केली होती. ही जमीन पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये (इको सेन्सेटिव्ह झोन) येते का, हे तपासून घेणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी येथील वनसंरक्षक कार्यालयातील लेखापाल सदाशिव ज्ञानदेव सातपुते यांच्याशी संपर्क साधला. सातपुते याने या कामासाठी दोन हजार रुपयाची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार अधिकाऱ्यांनी वनसंरक्षक कार्यालयात सापळा लावला होता. तेव्हा सातपुते हा दीड हजाराची लाच घेताना पकडला गेला. पंचासमक्ष लाचेची रक्कम वसूल करण्यात आली.