कासारवाडी गायरानाचा ताबा घेण्यासाठी वनाधिकाऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:29 AM2021-05-25T04:29:26+5:302021-05-25T04:29:26+5:30
कासारवाडी येथील गायरानाचा ताबा घेण्यासाठी वन विभागाने टाळाटाळ केली असून ताबा घेण्यासाठी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी आलेच नाहीत. हातकणंगले ...
कासारवाडी येथील गायरानाचा ताबा घेण्यासाठी वन विभागाने टाळाटाळ केली असून ताबा घेण्यासाठी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी आलेच नाहीत.
हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथील गायरान ‘गट नंबर ६३०/१/अ’ची वन विभागाला ताब्यात देण्याचेे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी फेब्रुवारी महिन्यात दिले होते. तसे लेखी पत्र तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी वन विभागाला दिले होते. महसूल विभागाने ३१० एकर जमिनीच्या हद्दी व मोजणी सुरू केली होती. ही मोजणी व हद्दी पूर्ण झाल्या आहेत.
सन १९५३ साली ३१० एकर जमीन वनविभागाला देण्याचे आदेश दिले होते; पण ती वर्ग झाली नव्हती. आता शासन निर्णयानुसार ती वनविभागाला ताब्यात देण्यात येणार आहे.
मौजे कासारवाडी येथील गायरान गट क्र. ६३०/१/अ जमिनीचा ताबा देण्याबाबत हातकणंगले तहसील कार्यालयाने वनपरिक्षेत्र विभाग करवीर यांना दि. ४ फेब्रुवारी रोजी लेखी कळवले होते. कासारवाडी गायरानचा विषय गेली कित्येक वर्षे वादग्रस्त आहे. यावर अनेक वेळा तक्रारी, पाहणी होऊन मंत्रालयापर्यंत ही बाब गेलेली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी कासारवाडी गायरानमधील होणाऱ्या दगड उत्खननाबाबत कासारवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने हरित लवादाकडे तक्रार दाखल केली होती. २० नोव्हेंबर १९५३ रोजी या गायरानातील संरक्षित वन अधिसूचित झालेले आहे. यामुळे गायरानातील क्षेत्र या क्षेत्राचा ताबा त्वरित वनविभागाकडे जाणार असल्याने महसूल व वन विभाग यांनी संयुक्तपणे अंतिम हद्दी जी.पी.एस.द्वारा पाहणी करून घेतली.
कासारवाडी येथील गायरान गट नं. ६३० सातबारा उताऱ्यावर ‘संरक्षित वन’ म्हणून नोंद झाली आहे. सोमवारी (दि.२४) रोजी मोजणी संपवून महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी वरिष्ठांच्या आदेशानुसार कासारवाडीची जागा वनविभागाच्या ताब्यात देण्यासाठी प्रत्यक्षात जागेवर दिवसभर थांबून होते; पण वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी एकमेकाकडे बोट दाखवत याकडे पाठ फिरवल्याने परिसरात चेर्चेचा विषय बनले आहे.
फोटो ओळी :-
कासारवाडी येथील गायरान वनविभागाच्या ताब्यात देण्यासाठी उपस्थित असलेले महसूल विभागाचे अधिकारी.