स्टार १११७ कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांच्या मदतीचा मेसेज बनावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:51 AM2021-09-02T04:51:21+5:302021-09-02T04:51:21+5:30
कोल्हापूर : केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना चार लाख ...
कोल्हापूर : केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये देण्यात येणार असल्याचा समाजमाध्यमावरील मेसेज बनावट असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्यावर्षीपासून कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने उच्छाद मांडला असून पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूची संख्या वाढली आहे. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील २ लाख ३ हजार ९९९ जणांना कोरोनाची लागण झाली होती. यातील १ लाख ९६ हजार ८२२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ५ हजार ७०० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १४७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांना खर्चही मोठा आलेला असतो. शासकीय रुग्णालयात जे रुग्ण दाखल केले जातात त्या ठिकाणी फारसा खर्च येत नाही. मात्र, खाजगी रुग्णालयातील बिले भरता भरता नातेवाइकांना नाकी नऊ आल्याची अनेक उदाहरणे आहेत. अनेक जणांचा मृत्यू झाला तरी त्यांची खाजगी रुग्णालयातील बिले पाच, सहा लाख झाल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे हवालदिल झालेल्या अनेक नागरिकांना हा चार लाखांचा मेसेज दिलासा देणारा ठरत आहे; परंतु त्याची सत्य माहिती नसल्याने अनेक जण कागदपत्रांची जुळणी करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चौकशी करत आहेत. मात्र, हा मेसेजच बनावट असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
चौकट
काय आहे मेसेज
केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्याच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये देण्यात येणार आहेत, असा हा मेसेज आहे. यासाठी करावयाचा अर्ज, न्यायालयाचा निकाल, मंत्रालयाचे पत्रही जोडण्यात आले आहे. ही सर्व कागदपत्रे आणि अर्ज भरून जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करावा, अशी सूचनाही या मेसेजमध्ये करण्यात आली आहे.
चौकट
रोज फोनवरून चौकशी सुरूच
रोज कोणी ना कोणी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे याबाबत फोनवरून चौकशी करत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अशी कोणतीही योजना नसल्याचे सांगण्यात येत आहे. काही जण अर्जही घेऊन येत आहेत. मात्र, योजनाचा नसल्याने त्यांचे अर्जही स्वीकारले जात नसल्याचे सांगण्यात आले.
कोट
अशी कोणतीही योजना नाही
केंद्र शासनाची अशी कोणतीही योजना नाही. त्यामुळे नागरिकांनी बनावट मेसेज वाचून अर्ज दाखल करू नये. तसेच कोणी अशा पद्धतीने मदत मिळवून देतो, असे सांगितले तरी या भूलथापांना बळी पडू नये. केंद्र किंवा राज्य शासनाची अशी कोणीतीही योजना नसल्याने नागरिकांनी अशा मेसेजना बळी पडू नये.
-प्रसाद संकपाळ
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,
जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर