विद्यापीठाच्या डायरी, कॅलेंडरमध्ये ‘शिवरायांचा’ विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:58 PM2020-03-13T12:58:02+5:302020-03-13T12:58:25+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाकडून नवीन वर्षाची डायरी, कॅलेंडर तयार केले असून, त्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या छायाचित्राचा समावेश नाही. डायरीतील कॅलेंडरमध्येही ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाकडून नवीन वर्षाची डायरी, कॅलेंडर तयार केले असून, त्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या छायाचित्राचा समावेश नाही. डायरीतील कॅलेंडरमध्येही चुका आहेत. त्याचा अधिसभा सदस्यांनी गुरुवारी निषेध केला. या चुकांबाबत दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. या डाय-या मागे घेऊन, त्यांचा संपूर्ण खर्च दोषींकडून वसूल करण्यात यावा, अशी त्यांनी मागणी केली.
प्रश्नोत्तरांचा तास सुरू होण्यापूर्वी शंकरराव कुलकर्णी यांनी विद्यापीठाच्या डायरी, कॅलेंडरमध्ये छत्रपती शिवरायांचे छायाचित्र नाही. कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून डॉ. अभिजित चौधरी यांचे नाव प्रसिद्ध झाल्याची चूक दाखवून दिली. डायरीतील कॅलेंडरमध्ये फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा, तर मार्चमधील तारीख, वारांमध्ये चूक झाल्याचे प्रताप माने यांनी सांगितले. इला जोगी यांनी विद्यापीठाने ही डायरी मागे घ्यावी व सुधारित डायरी द्यावी, अशी मागणी केली. या चुकांसाठी दोषी असणाऱ्यांकडून डाय-यांसाठीचा खर्च वसूल करा.
दोषींवर एक महिन्याच्या आत कारवाई करा, अशी मागणी प्रताप पाटील आणि मधुकर पाटील यांनी केली. त्यावर डायरीमधील चुका, त्रुटी गंभीर आहेत. त्याबाबत संबंधितांकडून खुलासा मागविला जाईल, त्यासह चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले.
अॅलर्जी कोणाला?
ज्यांच्या नावाने विद्यापीठ आहे, अशा छत्रपती शिवरायांच्या छायाचित्राची कोणाला अॅलर्जी आहे? असा सवाल श्रीनिवास गायकवाड यांनी उपस्थित केला. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली.
अधिसभा दृष्टिक्षेपात
* अवघ्या दोन प्रश्नांमध्ये आटोपला प्रश्नोत्तरांचा तास
* या तासात उपप्रश्नांवर चर्चेचे गुºहाळ
* कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या कारकिर्दीतील अखेरची अधिसभा
* सायंकाळी साडेसातपर्यंत ४३ पैकी १६ विषयांवर चर्चा.
विद्यापीठाच्या बदनामीस प्रशासन जबाबदार
परीक्षा विभागाच्या ‘एसआरपीडी’ प्रणालीच्या चौकशीचा अहवाल प्राचार्य डी. जी. कणसे यांनी अधिसभेसमोर मांडला. त्यात उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा निर्णय पुढील बैठकीत घेण्याबाबतचे मांडले. त्यावर निर्णय घेण्यास, कार्यवाही करण्यास प्रशासन विलंब करते. विद्यापीठाची बदनामी होण्यास प्रशासनच जबाबदार असल्याचे डॉ. प्रताप पाटील यांनी सांगितले. डिसेंबरमधील अधिसभेचा त्याग केल्याचा उल्लेख इतिवृत्तात नसल्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘डायरी’तील चुकांबाबत कल्पना होती. त्यावर कारवाई सुरू असल्याचे कुलसचिवांनी सांगताच ‘टिपिकल प्रशासकीय’ उत्तर देऊ नका. विषय गांभीर्याने घेऊन कारवाई करा, अशी संतप्त भावना काही सदस्यांनी व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाच्या डायरीमधील कॅलेंडरमध्ये चुका झाल्या आहेत.
शिवाजी विद्यापीठाच्या डायरीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांचे नाव चुकीचे प्रसिद्ध झाले आहे.