Navratri : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई वैष्णवी देवीच्या रूपात, पर्यटकांचा ओघ सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 06:15 PM2018-10-15T18:15:15+5:302018-10-15T18:17:37+5:30
शारदीय नवरात्रौत्सवात अश्विन शुद्ध षष्ठीला (सोमवार) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची वैष्णवी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. ही देवता विष्णूचे स्त्रीरूप असून सप्तमातृकांपैकी एक आहे.
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात अश्विन शुद्ध षष्ठीला (सोमवार) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची वैष्णवी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. ही देवता विष्णूचे स्त्रीरूप असून सप्तमातृकांपैकी एक आहे.
नवरात्रौत्सवात सहाव्या दिवशी दुपारच्या आरतीनंतर श्री अंबाबाईची वैष्णवी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. ही देवी म्हणजे विष्णुचे स्त्रीरूप अथवा विष्णुशक्ती असून, सप्तमातृकांपैकी एक आहे. मत्स्यपुराण, महाभारत, देवीमहात्म्यामध्ये या देवतेचा उल्लेख येतो. मत्स्यपुराणानुसार शिवाने अंधकासुराच्या नाशासाठी ज्या मातृकांची निर्मिती केली, त्यातील ही एक मातृका.
देवीमहात्म्यानुसार महासरस्वती अथवा कौशिकीच्या मदतीला शुंभ-निशुंभाच्या विरोधात ज्या मातृका निर्माण झाल्या, त्यात वैष्णवीचा उल्लेख येतो. वैष्णवी म्हणून विष्णुसारखी शंख, चक्र-गदा-पद्मधारण करणारी. गरूडासना. हिला संध्यावदनामध्ये यजुर्वेदीरूपी माध्यान्ह गायत्री म्हणजेच दुपारच्या सूर्याची देवता मानतात. ही पूजा सारंग मुनीश्वर, मनोज मुनीश्वर, लाभेश मुनीश्वर यांनी बांधली.