शेळकेंच्या रूपाने हातकणंगलेत ‘लाल दिवा’
By admin | Published: January 29, 2016 10:25 PM2016-01-29T22:25:13+5:302016-01-30T00:11:51+5:30
सामान्य कार्यकर्त्याला मंत्रिपदाचा दर्जा : काँग्रेस-राष्ट्रवादीला पंधरा वर्षांत जमले नाही
आयुब मुल्ला-- खोची --हातकणंगले तालुक्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महामंडळाचे अध्यक्षपद देऊन ‘लाल दिव्या’ची गाडी दिली. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांना यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले. यासाठी इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्रतिष्ठा पणाला लावून हे पद मिळवून दिले. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात एका सामान्य कार्यकर्त्याला राज्य मंत्रिपदाचा दर्जा देण्याचे धाडस भाजप करते, असा चांगला संदेश चर्चिला जात आहे. याउलट काँग्रेस-राष्ट्रवादीने मात्र पंधरा-वीस वर्षांत सत्ता असूनही असा सन्मान केला नाही. सामान्य शहरांतील कार्यकर्ते नगरसेवक झाले. नगराध्यक्ष झाले. त्यापलीकडे राज्यपातळीवर अलीकडच्या काळातील काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता असताना मोठे पद दिले नाही. याचा फटका पक्षवाढीवर निश्चितपणे झाला. राष्ट्रवादीच्या ताब्यातील इचलकरंजी मतदारसंघातील खासदारकी सुद्धा गेली. त्यामुळे विधानसभा, लोकसभा यापासून प्रस्थापित काँग्रेस-राष्ट्रवादीला दूर राहावे लागले.इचलकरंजी शहरात वस्त्रोद्योगाचे मोठे जाळे आहे. सहकारी संस्था मोठ्या प्रमाणात आहेत. त्यावर काँग्रेसचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी गटबाजीत अडकलेली आहे. तरीसुद्धा या पक्षाचे कार्यकर्ते भक्कम आहेत. अशा परिस्थितीत आमदार हाळवणकर यांनी आपली भूमिका कार्यकर्त्यांचा सन्मान करणारी ठेवली. स्वत:ला महामंडळाचे अध्यक्षपद घेता आले असते; परंतु तसे न करता हिंदुराव शेळके यांच्यासाठी त्यांनी पक्ष पातळीवर प्रतिष्ठा पणाला लावली. यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपद त्यांनी शेळके यांच्या रूपाने हातकणंगले तालुक्यात आणले. स्वत:ला नाही; परंतु कार्यकर्त्याला राज्य मंत्रिपदाचा दर्जा एक आमदार मिळवून देऊ शकतो ही सन्मान करणारी बाब आहे. यापूर्वी तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादीने केले नाही ते हाळवणकर यांनी केले. हा संदेश आता चर्चेचा विषय बनला आहे. यावरून नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
आवाडे, आवळे यांना मंत्रिपद
हातकणंगले तालुक्यात दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. अनेक वर्षे या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले. इचलकरंजी व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व अनुक्रमे प्रकाश आवाडे व जयवंतराव आवळे यांनी केले. आवाडे यांना दोनवेळा, तर जयवंतराव आवळे यांना २५ वर्षांत एकवेळा मंत्रिपद मिळाले; परंतु महामंडळाचे अध्यक्षपद मात्र कोणा सामान्य कार्यकर्त्याला मिळाले नाही.