शिवसेनेच्या भूमिकेने इच्छुकांची मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:17 AM2021-06-21T04:17:50+5:302021-06-21T04:17:50+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आज, सोमवारी राजीनामे होण्याची शक्यता असल्याने त्या पदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली ...
कोल्हापूर : जिल्हा परिषदेमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आज, सोमवारी राजीनामे होण्याची शक्यता असल्याने त्या पदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेच्या शिवानी भोसले, वंदना जाधव व कोमल मिसाळ यांची नावे सभापतिपदी निश्चित असून चौथे सभापती व अध्यक्ष, उपाध्यक्षपदाबाबत उत्सुकता कायम राहणार आहे.
शिवसेनेच्या सभापतींनी राजीनामे देण्यास टाळाटाळ केल्याने जिल्हा परिषदेमधील पदाधिकारी बदल लांबणीवर पडला होता. ठरल्याप्रमाणे राजीनामे न दिल्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर शिवसेनेच्या वरिष्ठांकडून बदलाबाबत आदेश देण्यात आला आणि आज संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांच्या उपस्थित कोल्हापुरात बैठक होत आहे. या बैठकीनंतर शिवसेनेचे तीन सभापती राजीनामे देण्याची शक्यता आहे. या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर स्वाभिमानीच्या पद्माराणी पाटील यांच्यासह अध्यक्ष बजरंग पाटील व उपाध्यक्ष सतीश पाटील यांचे राजीनामे घेतले जाणार आहेत.
विद्यमान सभागृहाची मुदत संपण्यास सात महिन्यांचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे विधानपरिषद व त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंंहिता असल्याने या पदाधिकाऱ्यांना जेमतेम चार-पाच महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे लवकर पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन निवडी करण्यासाठी सदस्यांचा दबाव वाढला आहे.
राजीनाम्यांची प्रक्रिया सुरू झाल्याने इच्छुकांनी आपापल्या नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. शिवसेनेतील फाॅर्मुल्यानुसार खासदार संजय मंडलीक, माजी आमदार चंद्रदीप नरके व आमदार प्रकाश आबीटकर गटाला एक-एक सभापती पद मिळणार आहे. उर्वरित एक सभापती व अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी उत्सुकता आहे.
सदस्य संख्येचा विचार केल्यास अध्यक्ष पद हे कॉंग्रेसकडे राहील तर उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीकडे येईल, असे सध्या तरी दिसते. मात्र अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे, या पदासाठी राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ सदस्य युवराज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. जर उपाध्यक्ष पद मिळाले तर विजय बोरगे (शाहूवाडी) व मनोज फराकटे (बोरवडे, कागल) यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. कॉंग्रेसकडे अध्यक्षपद आले तर पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून सरिता शशिकांत खोत, भगवान पाटील व आमदार पी. एन. पाटील यांच्याकडून राहुल पाटील व पांडुरंग भांदिगरे यांचे नावे पुढे येऊ शकतात.
यांची निवड निश्चित -
बांधकाम सभापती - शिवानी भोसले (चिखली, कागल)
समाजकल्याण - कोमल मिसाळ (वडगणे, करवीर)
महिला, बालकल्याण - वंदना जाधव (वाळवे, राधानगरी)
शिक्षण - सत्ताजुळणीनंतर नाव निश्चित
अध्यक्षपदाबाबत दोन्ही कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच
सव्वा वर्षानंतर अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याचे ठरले होते, असा दावा त्यांचे सदस्य करत आहेत. मात्र संख्याबळानुसार ते कॉंग्रेसकडेच राहील, असे त्यांचे सदस्य सांगतात. मात्र जो फाॅर्मुला ठरला तो पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्येच आहे. ते दोघेही नेमका अध्यक्ष कोणाचा होणार, हे स्पष्ट करत नसल्याने अध्यक्ष पदावरून दोन्ही कॉंग्रेसमधील इच्छुकांकडू रस्सीखेच सुरू आहे.
आवाडे गट आघाडीसोबत
आमदार प्रकाश आवाडे यांचे दोन सदस्य गेल्यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी भाजपसोबत राहिले. सभापती निवडीवेळी ते महाविकास आघाडीसोबत राहिले. यावेळीही महाविकास आघाडीसोबतच ते दोन सदस्य राहतील.