‘गोकुळ’नंतर जिल्हा बँक, बाजार समितीची मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:25 AM2021-05-10T04:25:01+5:302021-05-10T04:25:01+5:30
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’ची लढाई एकहाती जिंकल्याने ...
राजाराम लोंढे,
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी ‘गोकुळ’ची लढाई एकहाती जिंकल्याने आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. जिल्हा बँक, बाजार समितीची सत्ता कायम राखण्यासाठी दोन्ही नेत्यांनी ‘गोकुळ’च्या निवडणुकीतच पेरणी केली असून आघाडीची बांधणी आणि निवडणुकीत जोरदार काम करण्याची दोन्ही मंत्र्यांची कार्यपध्दती पाहता, जिल्हा बँक व बाजार समितीच्या आघाडीच्या विजयाचा अश्वमेध रोखणे विरोधकांसमोर एक आव्हान आहे.
राजकारणात योग्यवेळी घेतलेले बेरजेचे निर्णय, मुत्सद्देगिरीने पॅनेलची केेलेली बांधणी आणि राजकीय ताकदीचा वापर करून राबविलेली प्रचार यंत्रणा, या सगळ्यांमुळे अवघड निवडणूकही कशी सोपी होते, हे ‘गोकुळ’च्या निवडणुकीत पाहावयास मिळाले. मंत्री मुश्रीफ व मंत्री पाटील यांनी भविष्यातील राजकारणाचा वेध घेऊनच ‘गोकुळ’च्या निवडणुकीला सामाेरे गेले. साधारणत: सप्टेंबरमध्ये जिल्हा बँक व बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. ‘गोकुळ’ला बांधलेली मोट जिल्हा बँकेतही कायम राहिल्यास करवीर व हातकणंगले वगळता इतर तालुक्यात आघाडीला फारशी अडचण नाही. ठरावांचे गणित पाहिले, तर पन्हाळ्यात आमदार विनय काेरे, शिरोळमधून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची पकड कायम राहील. शाहूवाडीत मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे मानसिंगराव गायकवाड यांचा ‘जनसुराज्य’चे सर्जेराव पाटील यांच्याकडून अनपेक्षितपणे पराभव झाला होता. गायकवाड यांनी आता भक्कम बांधणी केली आहे. गगनबावड्यात मागील निवडणुकीत पी. जी. शिंदे यांनी बाजी मारली असली तरी, आता तेथून पालकमंत्री सतेज पाटील यांनी तयारी केली आहे.
कागलमधून मंत्री हसन मुश्रीफ, राधानगरीतून ए. वाय. पाटील, भुदरगडमधून के. पी. पाटील, चंदगडमधून राजेश पाटील, तर गडहिंग्लजमधून संतोष पाटील, करवीरमध्ये पी. एन. पाटील व हातकणंगलेमधून महादेवराव महाडिक यांची परिस्थिती सध्या तरी भक्कम दिसत आहे. आजरामधून अशोक चराटी प्रतिनिधीत्व करत आहेत. आता राष्ट्रवादीचे सुधीर राजाराम देसाई यांनी तयारी केली आहे. मात्र ‘आजरा’ कारखाना, ‘गोकुळ’चे राजकारण पाहता, जागा राखताना चराटी यांची दमछाक होणार हे निश्चित आहे.
साडेसहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी आघाडीची पकड घट्ट आहे. एकूणच ‘गोकुळ’च्या माध्यमातून मंत्री मुश्रीफ व मंत्री सतेज पाटील यांनी बांधलेली मोट पाहता, जिल्हा बँकेसह बाजार समितीमध्ये विजयाचा अश्वमेध रोखणे विरोधकांना कठीण जाणार आहे.
शाहूवाडी, गगनबावड्याचा मुश्रीफ यांच्यासमोर पेच
शाहूवाडीत मागील निवडणुकीत जनसुराज्यचे सर्जेराव पाटील-पेरीडकर यांनी राष्ट्रवादीचे मानसिंगराव गायकवाड यांचा पराभव केला होता. येथे गायकवाड यांनी पुन्हा तयारी केली आहे. गगनबावड्याचे पी. जी. शिंदे हे भाजपमध्ये असले तरी त्यांनी गेल्या पाच वर्षात जिल्हा बँकेत मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काम केले. येथून मंत्री सतेज पाटील इच्छुक आहेत. त्यामुळे शाहूवाडी व गगनबावड्यातील गुंता कसा सोडवायचा, हा पेच मंत्री मुश्रीफ यांच्यासमोर आहे.
विरोधकही मोट बांधण्याच्या तयारीत
‘गोकुळ’ हातातून गेल्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विरोधकही आक्रमक राहणार आहेत. विरोधकांचे करवीर व हातकणंगले हे बालेकिल्ले आहेत, त्यासोबत शाहूवाडी, आजरा, चंदगड, राधानगरी या तालुक्यात ते चांगल्याप्रकारे जोडण्या लावू शकतात.