कोल्हापुरात भाजपला धक्का; अखेर समरजित घाटगे तुतारी हाती घेणार, जयंत पाटलांच्या उपस्थित कागलात पक्षप्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 12:53 PM2024-08-23T12:53:19+5:302024-08-23T12:54:58+5:30
कोल्हापूर : शाहू समुहाचे नेते समरजित घाटगे अखेर भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत. ...
कोल्हापूर : शाहू समुहाचे नेते समरजित घाटगे अखेर भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत. कागलमध्ये आज, शुक्रवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांनी आगामी विधानसभेचे रणशिंग फुंकले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सायंकाळी चार वाजता कागलमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत. यासाठी जयंत पाटील मुंबईहून खास विमानाने कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत.
खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री घाटगे यांची त्यांच्या नागाळा पाकमधील निवासस्थानी भेट घेत आणि त्यांच्याशी चर्चा करत मनधरणी केली होती. मात्र यावेळी मी फार पुढे गेलो आहे आता मागे फिरणे अशक्य आहे अशा स्पष्ट शब्दात समरजित घाटगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती.
विधानसभेच्या मागील निवडणुकीत 'कागल'मध्ये तिरंगी लढत झाली होती. यावेळी समरजित घाटगे यांनी ८८ हजार मते घेतली होती. तेव्हापासून त्यांनी भाजपच्या माध्यमातून पाच वर्षे तयारी केली आहे, मध्यंतरी राज्यातील नवीन समीकरणामुळे त्यांची कोंडी झाली. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांना जाणार आहे. त्यात महाविकास आघाडीचे संजय घाटगे यांनी निवडणुकीतून माघार घेऊन मुश्रीफ यांना पाठिंबा दिल्याने 'कागल'चे राजकारण वेगळ्या वळणावर आले.
समरजीत घाटगे यांनी संपर्क मोहीम राबवली असली तरी ते कोणत्या पक्षातून लढणार याविषयी उत्सुकता होती. आघाडीमध्ये 'कागल'ची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जाणार असल्याने त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. अखेर त्यांच्या पक्षप्रवेशावर आज शिकामोर्तब झाला.
सोशल मीडिया अकाऊंटवरून कमळ हटवलं
काल, गुरुवारी झालेल्या महायुतीच्या तपोवन मैदानावरील महिला मेळाव्याला एकीकडे दांडी मारतानाच त्यांनी दुपारनंतर आपल्या फेसबुक अकाऊंटवरून कमळ चिन्हही हटवले आहे. त्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघात आता पालकमंत्री हसन मुश्रीफ हे महायुतीचे तर समरजित घाटगे हे महाविकास आघाडीचे उमेदवार अशी लढत निश्चित आहे.