गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचे सत्तेसाठी अंबाबाईला साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 03:48 PM2022-02-24T15:48:42+5:302022-02-24T15:53:15+5:30
याआधी प्रमोद सावंत यांनीही कोल्हापुरात येवून अंबाबाई देवीचे दर्शन घेतले होते
कोल्हापूर : गोव्यामध्ये काँग्रेस सत्तेत यावे यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीला साकडे घातले. दिगंबर कामत हे आज, गुरुवारी सपत्नीक कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. त्यांचे समवेत माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांची देखील भेट घेतली. तेथून ते नृसिंहवाडीला दत्त दर्शनास गेले. कामत यांचा खासगी दौरा असलेने प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. याआधी प्रमोद सावंत यांनीही कोल्हापुरात येवून अंबाबाई देवीचे दर्शन घेतले होते.
गोव्यामध्ये यावेळच्या विधानसभा निडणुकीमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. दरम्यान, मतदान प्रक्रियेनंतर त्रिशंकू विधानसभेचे संकेत मिळत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील असा विश्वास काँग्रेस पक्षाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
गोव्यामध्ये विधानसभेच्या एकूण ४० जागा असून, सरकार स्थापन करण्यासाठी येथे कुठल्याही पक्षाला २१ जागा जिंकणे आवश्यक आहे. या निवडणुकीत तब्बल ७८.९४ टक्के मतदान झाल्याने गोव्यात पुन्हा भाजपाचं कमळ फुलणार की सत्ता परिवर्तन होणार याची चर्चा सुरू आहे. येत्या १० मार्चला निकालानंतर मात्र सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.