माजी नगरसेवकाने अधिकाऱ्याला शिवीगाळ करत दिली धमकी, कोल्हापूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By भारत चव्हाण | Published: January 12, 2023 04:28 PM2023-01-12T16:28:13+5:302023-01-12T16:33:18+5:30
महापालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये तीव्र संताप
कोल्हापूर : मंजूर असलेल्या ठिकाणी डांबरीकरणाचे काम करण्याऐवजी दुसरीकडे काम केले नाही म्हणून माजी नगरसेवक राहूल चव्हाण यांनी कनिष्ठ अभियंता उमेश बागुल यांना शिवीगाळ करत धमकी दिली. या निषेधार्थ महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आज, गुरुवारी दुपारपासून काम बंद आंदोलन केले. चव्हाण यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी आग्रही मागणी कर्मचारी संघाने प्रशासनाकडे केली आहे.
शाहूपुरी येथील डांबरी रस्त्याचे काम मंजूर असून हे काम अन्य ठिकाणी करावे असा आग्रह नगरसेवक राहूल चव्हाणांचा होता. चव्हाण यांनी सांगूनही कनिष्ठ अभियंता उमेश बागूल यांनी त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे संतापलेल्या चव्हाणांनी बागूल यांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. बागूल यांनी हा प्रकार उपशहर अभियंता, शहर अभियंता यांच्या कानावर घातला. शाहूपुरीत घडलेल्या या प्रकारामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये विशेषत: अभियंत्यांमध्ये तीव्र संताप पसरला.
हा प्रकार सर्वच कर्मचाऱ्यांना कळताच त्यांच्यातूनही संताप व्यक्त करण्यात येऊ लागला. सर्व अभियंते, विभागीय कार्यालयातील कर्मचारी तसेच प्रशासकीय इमारतीतील सर्व कर्मचारी महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात जमले. राहूल चव्हाण यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.