माजी नगरसेवकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2016 12:36 AM2016-04-07T00:36:54+5:302016-04-07T00:37:44+5:30

खोट्या कागदपत्राद्वारे जमिनीची विक्री : आपटेनगर येथील सव्वातीन एकर जमीन विकून संजय कोळेकरकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक

Former corporator arrested | माजी नगरसेवकास अटक

माजी नगरसेवकास अटक

googlenewsNext

कोल्हापूर : आपटेनगर, पोदार इंग्लिश स्कूलजवळील सुमारे आठ कोटी किमतीच्या सव्वातीन एकर जमिनीचे बनावट कागदपत्रांद्वारे हक्क व विकसन करारपत्र करून काही भागांची परस्पर विक्री करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवक संजय पोपटराव कोळेकर (वय ५०, रा. शनिवार पेठ) यांना करवीर पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यांचा साथीदार बाबूराव मल्लाप्पा वाली (रा. राजारामपुरी दुसरी गल्ली) हा फरार आहे.
याप्रकरणी प्रशांत कृष्णात राऊत (रा. कसबा बावडा) व त्यांची बहीण मेघा मधुकर पाटील (रा. शिगाव, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली, अशी माहिती पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी बोलताना दिली.
याबाबत पोलिसांनी सांगितले, आपटेनगर येथे कृष्णात ज्ञानू राऊत यांची सव्वातीन एकर जमीन आहे. ती त्यांनी मुलगा प्रशांत राऊत व मुलगी मेघा पाटील (रा. शिगाव-सांगली), दीपाली रानमाळे (रा. मुरगूड, ता. कागल) यांच्या नावे केली. २००२ मध्ये त्यांनी बाबूराव वाली, तुकाराम सदाशिव सुतार (रा. बालिंगा, ता. करवीर), तानाजी शिवाजी देसाई (रा. वाशीनाका), अशोक नामदेव सूर्यवंशी (रा. बेळवडे, ता. राधानगरी), आदींना घेऊन पंचरत्न डेव्हलपर्स नावाची भागीदारी फर्म रजिस्टर केली. या फर्मच्या माध्यमातून आपटेनगर येथील जागा विकसित करणार असल्याने त्यांनी बाबूराव वाली यांच्या नावे वटमुखत्यार पत्र व पंचरत्न डेव्हलपर्सच्या नावे विकसन करार केला. या करारासाठी त्यांनी मुलगा प्रशांत, मुलगी मेघा पाटील व दीपाली रानमाळे यांची संमती घेतली नव्हती.
दरम्यान, भागीदारी फर्ममध्ये त्यांच्यात वाद झाल्याने कृष्णात राऊत यांनी ३० सप्टेंबर २००२ रोजी विकसन करार रद्द केला. त्याची नोटीस त्यांनी फर्मला दिली. त्यास बाबूराव वाली सोडून इतर चौघांनी मान्यता दिली. त्यानंतर १ एप्रिल २०११ रोजी ही जमीन व्हिरोनिका डेव्हलपर्सचे संचालक दिलीप रामचंद्र मोहिते (रा. नागाळा पार्क) यांना वटमुखत्यार व विकसन करार रजिस्टर करून दिली. यावेळी त्यांनी मुलगा व दोन मुलींची संमती घेतली. त्यानंतर १२ एप्रिल २०१२ रोजी बाबूराव वाली व माजी नगरसेवक संजय कोळेकर यांनी परस्पर विकसन करार करारपत्र करून घेतले. परंतु राऊत यांनी २६ जुलै २०१३ रोजी हक्कसोडपत्र करून ही जमीन मुलगा प्रशांत, मुली मेघा पाटील व
दीपाली रानमाळे यांच्या नावावर केली. सध्या या जमिनीचा ताबा तिघांकडे आहे. त्यांनी बाबूराव वाली, संजय कोळेकर यांच्याशी कोणताही करार केला नसताना त्यांनी बनावट कागदपत्रांद्वारे हक्क व विकसन करारपत्र करून जमिनीच्या काही भागाची विक्री केली. हा प्रकार मुलगा प्रशांत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी व बहीण मेघा पाटील यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)

Web Title: Former corporator arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.