माजी नगरसेवक प्रकाश गवंडी यांना अटक
By Admin | Published: October 8, 2016 01:16 AM2016-10-08T01:16:16+5:302016-10-08T01:25:21+5:30
सहायक आयुक्त धमकी प्रकरण भोवले : जामिनावर सुटका
कोल्हापूर : महापालिकेचे सहायक आयुक्त सचिन खाडे यांना प्रभाग समिती सभापतींच्या केबिनमध्ये कोंडून घालत धमकी दिल्याप्रकरणी नगरसेविका माधवी गवंडी यांचे पती, माजी नगरसेवक प्रकाश आनंदराव गवंडी (वय ४४, रा. मस्कुती तलाव, शुक्रवार पेठ) यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
शहरातील प्रश्नांसंबधी गुरुवारी (दि. ६) शिवाजी मार्केट प्रभाग समितीच्या सभेमध्ये माजी नगरसेवक प्रकाश गवंडी व महापालिका सहायक आयुक्त सचिन खाडे यांच्यात जोरदार वादावादी झाली. सभा संपल्यानंतर गवंडी यांनी खाडे यांना सभापती अफजल पीरजादे यांच्या केबिनमध्ये बोलावून कोंडून घातले. यावेळी त्यांना बघून घेण्याची धमकी देत ते अंगावर धावून गेले. खाडे हे केबिनच्या बाहेर पडत असताना त्यांना तिथून जाण्यास मज्जाव केला. या प्रकारानंतर खाडे यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेतली. घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेत आयुक्त शिवशंकर हे स्वत: खाडे यांना घेऊन लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आले. त्यानंतर खाडे यांनी या ठिकाणी गवंडी यांच्याविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी गवंडी यांच्यावर कोंडून घालणे, रस्ता अडविणे (३४१), धमकी देणे (५०६), आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर शुक्रवारी दुपारी गवंडी यांना अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. सी. जोशी यांच्यासमोर हजर केले. यावेळी तपास अधिकारी डी. एम. गायकवाड यांनी आरोपीवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने केलेला गुन्हा गंभीर असून त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी केली. त्यावर न्यायालयाने गवंडी यांची जामिनावर सुटका केली. (प्रतिनिधी)
--------------
अटक टाळण्यासाठी नगरसेवकांची धडपड
प्रकाश गवंडी यांना अटक होणार असे समजताच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आर. के. पोवार, प्रा. जयंत पाटील, महापौर अश्विनी रामाणे यांचे सासरे मधुकर रामाणे, सभापती अफजल पीरजादे, नगरसेवक शारंगधर देशमुख, माजी उपमहापौर प्रकाश पाटील, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, विनायक फाळके, बाबा इंदुलकर, आदींनी पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांची भेट घेतली. गवंडी यांच्या विरोधातील ३४१ कलम मागे घ्या, त्यांना अटक करू नका, अशी विनंती सर्वांनी केली. त्यावर सावंत यांनी स्वत: आयुक्त तक्रार देण्यासाठी आले होते. गुन्हा दाखल झाला आहे; त्यामुळे कलम मागे घेऊ शकत नाही. त्यांना अटक करून न्यायालयात हजर करणे हे आमचे काम असल्याचे सांगितले. त्यानंतर नगरसेवकांनी सहायक आयुक्त सचिन खाडे यांनी नगरसेविका माधवी गवंडी यांना शिवीगाळ केली आहे. त्यांची तक्रार घ्यावी, अशी मागणी केली. सावंत यांनी तक्रार अर्ज दिल्यास आम्ही चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करू, असे आश्वासन दिले.
--------------------
सचिन खाडे यांच्याविरोधात तक्रार
कचरा उठाव करण्याच्या समस्येवर सचिन खाडे यांना विचारणा केली असता त्यांनी लज्जा उत्पन्न होईल असे अपशब्द वापरले. या प्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी तक्रार प्रकाश गवंडी यांच्या पत्नीने लक्ष्मीपुरी पोलिसांत केली. त्यानुसार पोलिसांनी खाडे यांच्याविरोधात कल
ताटकळत उभे ठेवले : प्रकाश गवंडी यांना शुक्रवारी दहा वाजता पोलिस ठाण्यात बोलावून घेतले होते. काही नगरसेवक पोलिस निरीक्षक सावंत यांच्या केबिनमध्ये बसून होते. यावेळी गवंडी यांना पोलिसांनी केबिनच्या बाहेर ताटकळत उभे ठेवले होते. काही वेळाने ते आतमध्ये येऊन खुर्चीवर बसले. त्यावेळी त्यांना ‘बसू नका, उभे राहा,’ असे सांगण्यात आले. काही वेळ उभे राहून पुन्हा खुर्चीवर बसल्यानंतर सावंत यांनी अन्य पोलिसांना सांगून गवंडी यांना गुन्हे शाखेच्या केबिनमध्ये नेण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना केबिनमध्ये आरोपीसारखे बसविले.