पोलिस अधिकाऱ्यावरच माजी नगरसेविकेच्या मुलाने रोखली एअरगन, कोल्हापुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 02:00 PM2024-01-08T14:00:49+5:302024-01-08T14:01:07+5:30
राजारामपुरी पोलिसांकडून घटना लपविण्याचा प्रयत्न
कोल्हापूर : वाद मिटविण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावरच एका माजी नगरसेविकेच्या मुलाने एअरगन रोखत धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी प्रतिभानगर परिसरात घडला. या प्रकरणी साहिल पाटील या संशयितास राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
प्रतिभानगर परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे पूर्ववैमनस्य आणि आर्थिक वादातून विक्रेत्यांनी संबंधित माजी नगरसेविकेच्या मुलास मारहाण केल्याचे समजते. या प्रकाराची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांचे एक पथक घटनास्थळावर पोहोचल्यानंतर त्यांच्याबाबतीत हा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे या परिसरात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.
शास्त्रीनगर परिसरात राहणाऱ्या एका माजी नगरसेविकेचा मुलाने रविवारी सायंकाळी एका सँडविच विक्रेत्याकडे पैशाची मागणी केली. यावेळी विक्रेत्यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. यातून विक्रेत्यांसोबत त्याची वादावादी झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या या नगरसेविकेच्या मुलाने घरी जाऊन ही घटना आईवडिलांना सांगितली. दरम्यान, या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी राजारामपुरी पोलिसांना दिली. याच वेळी तलवार आणि एअरगन घेऊन आलेल्या त्या नगरसेविकेच्या मुलाने दुचाकीवरून पुन्हा एंट्री घेतली.
त्याने विक्रेत्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. याच वेळी राजारामपुरी पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या मुलास अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने स्वत:जवळील एअरगन एका पोलिस अधिकाऱ्यावरच रोखली. या प्रकरणी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन राजारामपुरी पोलिस ठाण्यात नेले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, या प्रकारामुळे घटनास्थळावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरातील नागरिक या प्रकारामुळे भयभीत झाले.
खाद्यपदार्थ विक्रेत्यांना मारहाण
माजी नगरसेविकेच्या या मुलाने सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास प्रतिभानगर परिसरातील एका सँडविचवाल्याकडे पैसे मागितल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला आहे. आर्थिक देवाणघेवाण आणि पूर्ववैमनस्यातून विक्रेत्याचा आणि संबंधिताचा वाद झाला. यातून एकमेकांना धक्काबुक्की झाल्याचा प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नगरसेविकेच्या मुलाने घरातून तलवार आणि एअरगन आणल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले. दरम्यान, वादावादीमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाही धक्काबुक्की करत त्यांच्यावरच एअरगन रोखल्याचेही काही व्यावसायिकांनी सांगितले.
राजारामपुरी पोलिसांकडून घटना लपविण्याचा प्रयत्न
दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यावरच एअरगन रोखल्याचा धक्कादायक प्रकार घडूनही राजारामपुरी पोलिसांनी ही घटना लपविण्याचा प्रयत्न केला. केवळ एका माजी नगरसेविकेच्या मुलामध्ये आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे सांगत यावर पडदा टाकला जात होता. दरम्यान, १५ दिवसांपूर्वी खासगी सावकारकी करणाऱ्या व्यक्तींबाबत राजारामपुरी पोलिसांनी घेतलेली भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असतानाच हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी तीन खासगी सावकारांना अटक करूनही त्याबाबतची माहिती लपविण्याचे काम सुरू आहे. यामागचे गौडबंगाल अद्यापही गुलदस्तात आहे.