Rajya Sabha Election: माजी नगरसेवक ते थेट राज्यसभेसाठीचे उमेदवार, संजय पवारांना पक्षनिष्ठेचे फळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 11:26 AM2022-05-25T11:26:24+5:302022-05-25T11:28:52+5:30
खरे तर त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याचे या उमेदवारीसाठी पक्षाकडून नाव चर्चेत येणे हाच मोठा बहुमान असल्याची भावना शिवसेनेतून व्यक्त होत आहे.
कोल्हापूर : राज्यसभेसाठी ज्यांचे नाव चर्चेत आले आहे ते शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार गेली ३० वर्षे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. महापालिकेचे माजी नगरसेवक ते आता थेट राज्यसभेचेच संभाव्य उमेदवार अशी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची चढती कमान आहे. खरे तर त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याचे या उमेदवारीसाठी पक्षाकडून नाव चर्चेत येणे हाच मोठा बहुमान असल्याची भावना शिवसेनेतून व्यक्त होत आहे.
विधानसभेसाठी मिळाली नाही संधी पण..
संजय पवार हे ताराबाई पार्कातील एसटी कॉलनीत राहतात. त्यांच्या अनंत नावाच्या बंगल्यावर कायमच शिवसेनेचा भगवा फडफडत असतो. पवार हे कोल्हापूर महापालिकेत तीन वेळा ताराबाई पार्क प्रभागातून नगरसेवक झाले. स्थायी सभापती, विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी महापालिकेत भूषवले. शिवसेनेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील उमेदवारीसाठी ते गेली २० वर्षे प्रयत्न करत आहेत; परंतु त्यांना ही संधी कधी मिळाली नाही.
लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर असणारा कार्यकर्ता
जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करण्यात, विविध प्रश्नांवर मोर्चे, आंदोलने करून लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यात त्यांचा कायमच पुढाकार राहिला. कायम लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर असणारा हा कार्यकर्ता आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यांचे नाव निश्चित केल्याचे वृत्त पसरताच सामान्य कार्यकर्त्यांतून आनंद व्यक्त झाला. मागील पाच वर्षात पक्षाने त्यांना आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद दिले. राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या या पदावर काम करताना त्यांनी मराठा समाजातील शेकडो तरुणांना या महामंडळाचा लाभ कसा सुलभपणे मिळेल यासाठी चांगले प्रयत्न केले.
शिवसेनेचे एका दगडात अनेक पक्षी..
- शिवसेनेतून सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याने संजय पवार यांचे नाव पुढे आले. हे दोघेही कोल्हापूरचे.
- संभाजीराजे शिवसेनेत आले नाही तरी बेहत्तर आम्ही पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यालाही उमेदवारी देऊन त्यांचा सन्मान करू शकतो अशी या घडामोडीत शिवसेनेची भूमिका दिसते.
- संभाजीराजे यांना पाठिंबा दिला नाही म्हणून मराठा समाज नाराज झाला तर आम्ही मराठा समाजातीलच कार्यकर्त्याला संधी देत असल्याचे त्यांनी पवार यांचे नाव पुढे आणून दाखवून दिले आहे.
शिवसेनेने माझ्या नावाचा उमेदवार म्हणून विचार केला याचा खूप आनंद झाला. मातोश्री हे आमचे मंदिर आहे. बाळासाहेब व उद्धव ठाकरे हे आमचे दैवत मानून पक्षात काम करत राहिलो. पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय दिला याचा खूप आनंद आहे. - संजय पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख, कोल्हापूर.