पन्हाळ्यात जनसुराज्य पक्षाच्या माजी उपनगराध्यक्षा यास्मिन मुजावर यांचा शिवसेनेत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:25 AM2021-04-01T04:25:33+5:302021-04-01T04:25:33+5:30
जनसुराज्य शक्ती पक्षाला खिंडार पडल्याची चर्चा असली तरी यास्मिन यांचे नगरसेवकपद व नव्याने बांधलेले बेकायदेशीर घर जात असल्याने ...
जनसुराज्य शक्ती पक्षाला खिंडार पडल्याची चर्चा असली तरी यास्मिन यांचे नगरसेवकपद व नव्याने बांधलेले बेकायदेशीर घर जात असल्याने ही राजकीय खेळी असल्याची चर्चा होत आहे.
पन्हाळा नगर परिषदेच्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या यास्मिन या नगरसेवक आहेत त्यांनी आपले जुने घर पाडून नवे घर बांधत असताना शेजारी राहणारे मुनीर इब्राहीम मुल्ला यांच्या जागेत अतिक्रमण केले. ते सिद्ध झाल्याने ३ नोव्हेंबर २०१८ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे नगरसेवक पद रद्द केल्याचा आदेश दिला. यावर यास्मिन यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री डाॕॅ. रणजित पाटील यांच्याकडून पद रद्दला स्थगिती घेतली. यावर तक्रारदार मुनीर मुल्ला उच्च न्यायालयात गेले असता न्यायालयाने चार महिन्यांत निकाल देण्याचे आदेश दिले; पण विधानसभा निवडणूक व कोरोनामुळे हा निकाल लांबत गेला. तक्रारदारांनी पुन्हा राज्य सरकारचा दरवाजा ठोठावला असता नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ऑनलाइन पद्धतीने २९ ऑक्टोबर २०२० रोजी सुनावणी घेतली. येणाऱ्या सोमवारी हा निकाल होता. त्यापूर्वीच यास्मिन यांनी घाईने शिवबंधन स्वीकारले. आता निकाल काही वेगळा लागणार नाही, नगरसेवकपद आणि बेकायदेशीर घर आहे तसेच राहणार हे निर्विवाद सत्य असले तरी जनसुराज्य पक्ष यास्मिन यांच्यावर पक्षांतर बंदीअंतर्गत कारवाई करणार का, जर केली नाही तर हे सर्व ठरवून केल्याचे सुज्ञ नागरिकांना समजून येणार, हे निश्चित. यास्मिन यांच्या घर बांधणीला पुरातत्व खात्याची परवानगी नाही. त्यांना नगर परिषदेने अभय का दिले, हा चर्चेचा विषय झाला असून त्यांना केवळ जुने घर दुरुस्तीचा परवाना पुरातत्व विभागाने दिला होता.
फोटो.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करताना यास्मिन मुजावर.