जिल्हा बँकेच्या माजी संचालकांची आज सहकारमंत्र्यांसमोर सुनावणी

By admin | Published: September 29, 2015 11:47 PM2015-09-29T23:47:01+5:302015-09-29T23:54:37+5:30

सहकारमंत्री पाटील व माजी मंत्री मुश्रीफ यांच्यात कलगीतुरा सुरू आहे. त्या अनुषंगाने जिल्हा बँकेच्या दोषी संचालकांना सोडणार नसल्याचे जाहीर कार्यक्रमात सांगितले होते.

Former District Bank Directors today hear before the Cooperatives | जिल्हा बँकेच्या माजी संचालकांची आज सहकारमंत्र्यांसमोर सुनावणी

जिल्हा बँकेच्या माजी संचालकांची आज सहकारमंत्र्यांसमोर सुनावणी

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ४५ माजी संचालक, कार्यकारी संचालकांवरील जबाबदारी निश्चितीबाबतची महत्त्वपूर्ण सुनावणी आज, बुधवारी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर होत आहे. या प्रकरणात आजी-माजी मंत्री, आमदार अडकल्याने सुनावणीकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेचे ४५ माजी संचालक व एक कार्यकारी संचालकांवर सहकार विभागाने ‘कलम ८८’ नुसार १४७ कोटींची जबाबदारी निश्चितीची कारवाई केली आहे. चौकशी अधिकारी सचिन रावळ यांनी केलेल्या अहवालानुसार विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांनी संबंधितांना जबाबदारीचे पैसे भरा अन्यथा मालमत्ता जप्तीबाबत नोटिसा लागू केल्या होत्या. या नोटिसांविरोधात काही संचालकांनी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने नोटिसीला तात्पुरती स्थगिती देत माजी संचालकांना निवडणूक लढविण्यास परवानगी दिली होती. याबाबत सहकारमंत्र्यांकडे सुनावणीचे आदेशही न्यायालयाने दिले होते; पण गेली तीन महिने सुनावणीची प्रक्रिया रेंगाळलेली आहे. सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात विविध विषयांवरून कलगीतुरा सुरू आहे. त्या अनुषंगाने जिल्हा बँकेच्या दोषी संचालकांना सोडणार नसल्याचे एका जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. त्यानंतर या विषयाला पुन्हा गती मिळाली असून, याबाबतची सुनावणी आज घेणार असल्याचे मंत्री पाटील यांनी जाहीर केले होते.
चौकशी अधिकारी रावळ यांनी राजकीय दबावाखाली चौकशी केल्याने माजी संचालकांना त्याचा फायदा झाला. या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची घोषणा मंत्री पाटील यांनी केली आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत मंत्री पाटील नेमका काय निर्णय घेणार, याविषयी उत्सुकता आहे. जिल्हा बँकेच्या माजी संचालकांवरील कारवाई ही सहकारातील मोठी कारवाई असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Former District Bank Directors today hear before the Cooperatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.