Kolhapur: भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी घेतली शरद पवार यांची भेट, इचलकरंजीत खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 01:56 PM2024-10-04T13:56:03+5:302024-10-04T13:57:10+5:30
आवाडे हे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कट्टर विरोधक समजल्या जाणाऱ्या सर्वांचीच गोची
इचलकरंजी : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी गुरुवारी सांगलीमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे इचलकरंजीतील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, ते तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते.
दरम्यान, याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सहजच भेट घेतल्याचे सांगितले. परंतु, नेमके स्वत:साठी की अन्य कोणासाठी, त्यांनी ही भेट घेतली याबाबत खलबते सुरू आहेत. शेळके हे आमदार प्रकाश आवाडे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यांनी यापूर्वी इचलकरंजीचे नगराध्यक्षपद आणि राज्यमंत्र्याचा दर्जा असलेल्या यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. पूर्वी बाळासाहेब माने गटाचे कट्टर समर्थक म्हणून त्यांनी काम केले आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कालांतराने त्यांना आवाडे यांच्याविरोधात उमेदवारीही दिली होती. मात्र, नगरपालिका कर्मचारी धक्काबुक्की प्रकरणामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला होता.
त्यानंतर शेळके सातत्याने भाजपचे काम करीत राहिले. जिल्हाध्यक्षपदावर काम करताना त्यांनी ग्रामीण भागात पक्षाची मजबूत बांधणी केली. तसेच मागील तीन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे उमेदवार सुरेश हाळवणकर यांना साथ दिली. आवाडे हे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कट्टर विरोधक समजल्या जाणाऱ्या सर्वांचीच गोची झाली होती.
दरम्यान, पवार हे सांगली दौऱ्यावर असताना प्रकाश कुलकर्णी यांच्या घरी शेळके यांनी पवार यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील समजू शकला नाही. मात्र, शेळके हे स्वत: तुतारी घेणार की, दुसऱ्या उमेदवारासंदर्भात चर्चा करण्यासाठी गेले होते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. एखाद्याने भाजपमध्ये बंडखोरी करून उमेदवारी मिळविल्यास त्याचा मोठा परिणाम विधानसभा निवडणुकीमध्ये होणार आहे. असे झाल्यास सर्व राजकीय समीकरणेच बदलणार आहेत. तसेच काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारी करणारे राष्ट्रवादीचे सचिव मदन कारंडे हे कोणती भूमिका घेणार, याकडेही लक्ष राहणार आहे.
शरद पवार यांचा दोनवेळा फोन आला होता. त्यामुळे त्यांना सहज भेटण्यासाठी गेलो होतो. उमेदवारीसंदर्भात आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. - हिंदुराव शेळके, माजी जिल्हाध्यक्ष, भाजप.